शिरूर बाजार समितीच्या सभापती निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्याची जंगी मिरवणूक- सरकारी नियमांना धाब्यावर

पुणे : राज्यभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. संसर्ग वाढू नये यासाठी दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवण्याचं सरकारकडून वारंवार आवाहन केले जात आहे. पण शिरूर बाजार समितीच्या सभापती निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित सभापती शंकर जांभळकर यांची त्यांच्या करंदी गावात जंगी मिरवणूक काढून गुलालाचीही उधळण करत कार्यकर्त्यांनी डान्स केला. मात्र, यावेळी राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचा पार फज्जा उडवण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर शासकीय नियमांची पायमल्ली होत असल्याचं चिञ समोर येत आहे. शिरुर तालुक्यातील मोराची चिंचोली येथे मागील आठवड्यात एका लग्न समारंभांत एकञ येत नवरदेवाची वरात काढली . तर मंगळवारी कोरेगाव भीमा येथे तीसहून अधिक युवकांनी एकत्र येत वाढदिवस साजरा केला होता. या दोन्हीही प्रकरणी पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहे.

परंतु,शिरूर तालुक्यात बाजार समितीच्या सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सभापतीची गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील युवकांनी गुलालाची उधळण करून, डान्स करत मिरवणूक काढली. पण यावेळी कोणत्याही युवकांनी तोंडावर मास्क घातलेले दिसत नव्हते ना सार्वजनिक अंतर पाळलेले होते.

आता 2 दिवसांनंतर या मिरवणुकीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, त्यानंतर देखील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली नाही आणि मिरवणूक करणाऱ्या नागरिकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.

एकंदरीत शिरूर तालुक्यातील दोन ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिरूर व शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे. मात्र, करंदी येथे घडलेल्या घटनेवर पोलीस काय भूमिका घेणार कि राजकीय दबावाला बळी पडणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

WhatsApp chat