पादुका पंढरपूरला नेण्यासाठी बसभाडे वसूल करणे ठाकरे सरकारला शोभते का- आचार्य तुषार भोसले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इतिहासात प्रथमच आषाढी एकादशीला संतांच्या पालख्या एसटीमधून पंढरपूरला घेऊन जाण्यात आल्या आहेत. दरवर्षी लाखो वारकरी हरी नामाचा गरज करत वारीमध्ये सहभागी होतात. मात्र, सध्या जगभरासह महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातल्याने पालखी सोहळा रद्द करण्यात आला .

दरम्यान, पंढरपूरला विठूमाऊलीच्या भेटीसाठी शिवशाही बसमधून जाणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे ७१ हजार रुपयांचे तिकीट एसटी महामंडळाने फाडले आहे. शासनाने विनामूल्य बस उपलब्ध करून देण्यास असमर्थता दाखविल्याने परिवहन महामंडळाची असंवेदनशील कामगिरी त्यानिमित्ताने समोर आली आहे.

ही बातमी समोर आल्याने आघाडी सरकारची चांगलीच नाचक्की झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य सरकारवर चौफेर टीका आता होऊ लागली आहे. राज्यभरातील प्रमुख सात संतांच्या पालख्या पंढरपूरला नेण्यासाठी शासनाकडून शिवशाही बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं होत. मात्र आता प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.

आचार्य तुषार भोसले यांनी याच मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली आहे. संतांच्या पादुका पंढरपूरला नेण्यासाठी बसभाडे वसूल करणे ठाकरे सरकारला शोभते का ? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपण शब्द दिला होता की संतांच्या पादुका पंढरपूरला नेण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आहे मग विमान, हेलिकॉप्टर तर सोडाच पण बसभाडे सुध्दा सहन करण्याची ताकद महाराष्ट्र सरकारची नाही का ?

WhatsApp chat