कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी पुणे विद्यापीठातील इच्छुक आघाडीवर

पुणे : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी सुमारे 50 अर्ज आले आहेत. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागप्रमुखांनी अर्ज केले आहेत. कुलगुरूपदासाठी पुणे विद्यापीठातील सहा इच्छुकांची नावे समोर आली आहेत. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दयानंद शिंदे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. कुलगुरू पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज दाखल करण्यासाठी दि. 2 जुलै ही अंतिम मुदत होती. यासाठी सुमारे 50 अर्ज दाखल झाले आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी पुणे विद्यापीठातून आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य संजय चाकणे, संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे यांनी अर्ज केले आहेत. तसेच रसायनशास्त्र विभागातील अविनाश कुंभार आणि भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश गोसावी यांनीही अर्ज केल्याचे समजते. या पदासाठी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) दोन प्राध्यापकांनीही अर्ज केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

WhatsApp chat