पुणे जिल्ह्यासाठी ‘टेस्टिंग इन्चार्ज’ ची नेमूणक करा -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे: पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह ग्रामीण भागात करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, ही चिंतेची बाब आहे. करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी ‘टेस्टिंग इन्चार्ज’ म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याची नेमूणक करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार  यांनी दिले. दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशानुसार कडक निर्बंध राबवा असे सांगताना मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्देशही अजित पवार यांनी दिले.

पुणे येथील विधानभवनच्या ‘झुंबर हॉल’मध्ये करोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

कोविड रुग्णांवर उपचार करताना नॉन कोविड रुग्णाकडे दुर्लक्ष होता कामा नये, काही रुग्णालयांमध्ये डॉक्टर कोविड कक्षामध्ये जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा डॉक्टरांवर कारवाई करा, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागात ये-जा करत असल्यामुळे या भागात करोनाचा प्रसार होताना दिसून येत आहे. ग्रामीण भागात विविध समित्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने करोना विषाणूच्या संसर्गावर कसे नियंत्रण मिळवता येईल यासाठी योजना तयार करा. शहरातून ग्रामीण भागात तसेच ग्रामीण भागातून शहरी भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांची तपासणी पोलिसांनी करावी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये शासनाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.

सोलापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. यासाठी विभागीय आयुक्त यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याकरिता आवश्यक ती कार्यवाही करावी. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर उद्योगधंदे सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे कारखान्यातील कामगारांची गैरसोय होवू नये यासाठी कारखान्याच्या मालकांनी कामगारांची राहण्याची व्यवस्था करावी. तसेच काम करीत असताना करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार कामगारांना मास्क वापरण्यास, हात वारंवार धुण्यास आणि शारिरीक अंतर पाळण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नेमूणक करताना परिस्थितीनिहाय कामकाजाचे सूक्ष्म वाटप करा. ग्रामीण भागात करोना परिस्थिती आटोक्यात आण्यासासाठी ‘कम्युनिटी लिडर्स’ची मदत घ्या. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनातील करोना विषयक भीती घालविण्यासाठी जनजागृतीवर भर द्या, या गोष्टी करताना प्रतिबंधित क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करा, कोरोना बाधित रुग्ण तात्काळ शोधण्यासाठी आरोग्य पाहण्यांचे, चाचण्यांचे प्रमाण वाढवा, त्यांचे तपासणी अहवाल लवकरात लवकर प्राप्त करा, जेणेकरुन संसर्ग पसरणार नाही. एखादा कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची तात्काळ तपासणी करा, करोना बाधित रुग्णावर तात्काळ वर्गवारीनुसार उपचार सुरु करा, आरोग्य सेतू ॲप मधील माहितीचा प्रभावीपणे वापर करा, यासाठी राष्ट्रीय माहिती केंद्राची मदत घ्या. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊन कालावधीत शासनाच्या निर्देशाची कडक अमंलबजावणी करा, अशा स्वरुपाचा सर्वंकष कृती आराखडा तयार करा, अशा महत्त्वपूर्ण सूचना केल्या. कोरोना विषाणूविषयक नमुना चाचण्या वेळेत होतात का? याकरीता एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची सूचनाही मेहता यांनी केली.

WhatsApp chat