पुण्यात व्हेंटिलेटर नसल्याचा आरोप गिरीश बापटांनी फेटाळला

पुणे : पुण्यातील रुग्णालयांमध्ये आयसीयू व्हेंटिलेटरचा एकही बेड शिल्लक नसल्याची माहिती समोर आल्यानंतर भाजपचे नेते खासदार गिरीश बापट यांनी हे वृत्त फेटाळलं आहे विभागीय आयुक्तांच्या वेबसाईटवर माहिती अपडेट न केल्यानं तसं दिसलं. मात्र, पुण्यात सध्या 49 व्हेंटिलेटर शिल्लक असल्याचा दावा गिरीश बापट यांनी केला. तसेच आणखी 10 व्हेंटिलेटर येणार असून व्हेंटिलेटर अभावी कुणीही दगावणार नाही, असं आश्वासनही बापट यांनी दिलं.

पुणे विभागीय आयुक्तांच्या वेबसाईटवर (www.divcommpunecovid.com) दिलेल्या माहितीनुसार पुण्यात सध्या एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याची माहिती दिसत होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अत्यवस्थ रुग्णांच्या व्यवस्थेबाबत काळजी व्यक्त केली गेली. यानंतर खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात व्हेंटिलेटर नाहीत ही चुकीची माहिती असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, ‘आयुक्तांच्या वेबसाईटच्या डॅशबोर्डवर माहिती अपडेट केली गेली नाही. सध्या पुण्यात 49 व्हेंटिलेटर शिल्लक आहेत. आणखी 10 व्हेंटिलेटर मिळणार आहेत. एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर अभावी दगावणार नाही.’

‘पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याविषयी ज्यांनी लॉकडाऊन लावला त्यांना विचारा. चाचण्या वाढत आहेत, रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र, लॉकडाऊन हा एकमेव उपाय नाही. सर्वांना विश्वासात घ्या हेच आम्ही सांगत होतो. आता जर लॉकडाऊन वाढवला, तर त्यामुळे काय भूमिका घ्यायची हे ठरवू’, असं म्हणत बापट यांनी अजित पवार यांना सूचक इशारा दिला.

दरम्यान, पुणे शहरात रविवारी एकाच दिवसात विक्रमी कोरोनाबळींची नोंद झाली. काल (19 जुलै) दिवसभरात 41 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. शहरातील कोरोनाबळींचा एकूण आकडा 976 वर पोहोचला आहे. यानंतर व्हेंटिलेटरअभावीच रुग्णांच्या बळींमध्ये वाढ झाल्याचाही आरोप होत आहे.

पुणे जिल्ह्यात गेल्या 12 तासात 473 कोरोना रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 51 हजार 885 वर गेली. तर आत्तापर्यंत 1 हजार 343 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.