पवारांनी हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अपमान केला आहे- शिवसंग्रामचे विनायक मेटे

नाशिक – राम मंदिराच्या भूमिपूजनच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘पवारांनी हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. स्वत:ला हिंदू नेते म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता गप्प का,’ असा सवाल शिवसंग्रामचे मेटे यांनी केला आहे.

एकीकडे देशात कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे मात्र राम मंदिराच्या भूमिपूजनाचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातून याचे पडसाद उमटत आहेत. तसेच, या भूमिपूजनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार का याकडेही सगळ्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तर, या भूमिपूजाच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल टिका केली. राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार असले तर अवश्य भूमिपूजन करावं असं पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना शिवसंग्रामचे विनायक मेटे म्हणाले की, ‘मंदिर बांधून करोना जाणार नाही असं त्याचं म्हणणं असेल तर मंदिर न बांधून तो जाणार आहे का,’ असा प्रश्न मेटे यांनी पवारांना केला. ‘शरद पवारांनी हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अवमान केला आहे. स्वत:ला हिंदू नेते म्हणवणारे मुख्यमंत्री आता मूग गिळन गप्प का? त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी,’ असं आव्हानही मेटे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं.

दूध दरासाठी भाजपनं आज सुरू केलेल्या आंदोलनात मेटे यांची संघटनाही उतरली आहे. जिल्हाधिकारी मांढरे यांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावरही त्यांनी टीका केली. ‘राजू शेट्टी हे आता शेतकऱ्यांचे नेते राहिलेले नाहीत. त्यांची आंदोलनं दाखवण्यापुरती आहेत,’ असं मेटे म्हणाले.