कोरोना: मनसे आणि भाजपने चढवला हल्ला, सत्ताधारी सेनेला घेरण्याचा प्रयत्न

मुंबई : मुंबईतील कोरोना रुग्णांच्या स्थितीवरून भाजप आणि मनसेने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ‘मुंबईत रूग्ण कमी होत आहे, असा दावा मनपा करत असेल. पण कोरोना रूग्णांची संख्या आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या याची तपशीलवार माहिती दिली पाहिजे, तसंच टेस्ट कमी का होतात हेही स्पष्ट केले पाहिजे,’ अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. ‘सामना’ अग्रलेखात काँग्रेस पक्षाचे नेतेच हे राहुल गांधींविषयी काय बोलतात हे ऐकले पाहिजे असा टोला लगावला आहे. त्यावर मनसेनीही टीका केली. ‘सामना अग्रलेख लिहिणाऱ्या बोरूबहाद्दरांनी त्यांच्याविषयी आणि सेनेच्या महाविकास आघाडी सरकारविषयी सेनेचे बाकीचे नेते खासगीत काय बोलतात हे ऐकावे… म्हणजे खरे समजेल,’ असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

भाजपचाही घणाघात

‘मातोश्रीतून लोकं जेव्हा बाहेर पडून हिंडायला लागतील तेव्हाच मुंबईतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे, असं म्हणता येईल,’ अशी खरमरीत टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. ‘मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आलंय हा दावाच हास्यास्पद आहे. कमी चाचण्यांमुळे मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा कमी दिसत आहे. मुंबईतील मृत्यूदर देशातील मृत्यूदरापेक्षा जास्तच आहे,’ अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

दरम्यान, आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांनी कोरोनाच्या स्थितीबाबत एक अहवाल सादर केला असून कोरोना संसर्ग कधीपर्यंत आटोक्यात येऊ शकतो, याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे.

राजधानी मुंबईतील करोना संसर्ग पुढील दोन आठवड्यांमध्ये नियंत्रणात येईल, असा अंदाज आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांनी व्यक्त केला आहे. तर राज्यात पुढील दोन महिन्यांत संक्रमण रोखण्यात यश येईल, असंही सांगण्यात आलं आहे. ‘लेविट्स मॅट्रिक्स’ या गणितीय प्रारूपाच्या आधारे हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रुग्णांची संख्या, मृत्यू दर त्यासाठीचा कालावधी याचा आधार मुंबईच्या संगणकशास्त्र विभागातील डॉ. भास्करन रमण यांनी यासाठी घेतला.