राजेश टोपे यांना मातृशोक

मुंबई – राज्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोना परिस्थिती समर्थपणे हाताळणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदा टोपे (74) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्या प्रदीर्घ आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान १ ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. शारदा टोपे या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्षा होत्या.

शारदा टोपे यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४ वाजता पार्थपूर ता. अंबड जि. जालना या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे, त्याचे पालन करूनच अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, बैठका यातून वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री आईला भेटायला रुग्णालयात जात असत. रोज सकाळी आईला भेटूनच ते दिवसाची सुरुवात करायचे. आईच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ‘ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावले नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांसोबत ती सावलीसारखी राहिली. चार वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील’, अशा भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केल्या.

WhatsApp chat