श्रीराम कोणाच्या सातबारावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही.

नाशिक : श्रीराम कोणाच्या सातबारावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला. नाशिकच्या सिडको परिसरात स्व. बाळासाहेब ठाकरे कोविड रुग्णालयाचं उद्घाटन करताना आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाची पूजा केली “कोरोनामुक्त महाराष्ट्र घडो, हीच श्रीराम चरणी प्रार्थना” अशी मनोकामना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. “प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक भूमीचाच मी सुपुत्र, माझा जन्म नाशिकचा. लहानपणापासून काळाराम मंदिर माझ्या तोंडपाठ” असे आव्हाड सांगत होते “श्रीराम कोणाच्या सातबारावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. रामाच्या नावावर राजकारण करणे वेगळं आणि भक्ती करणं वेगळं. ज्याच्या मनात प्रामाणिकपणा, मर्यादा आहे, त्याच्यामध्ये राम आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम असं आपण म्हणतो. त्यामुळे हे भूमिपूजन करत आहेत, त्याचं एवढं काही नाही. त्यांना वाटतंय ते करत आहेत” असे यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“गेली 40 वर्ष भाजपने रामाच्या नावावर राजकारण केलं, हे अख्ख्या जगाला माहिती आहे. रामाचे नाव घेऊन त्यांनी पाणी विकलं, विटा विकल्या, सत्ता मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते त्यांनी रामाच्या नावावर केलं” असा घणाघातही आव्हाडांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोदी सरकारला आर्थिक नुकसानाकडे प्राधान्याने लक्ष देण्याचा सल्ला सोलापूर दौऱ्यात दिला होता. “आम्ही कोरोनाशी लढण्यावर उपाययोजना करत आहोत, पण मंदिर बांधून कोरोना जाईल असं काही जणांना वाटतं” असं ते म्हणाले होते.

WhatsApp chat