मराठा आरक्षणामध्ये पवारांनी मध्यस्थी करावी

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. राज्यात सत्ताधारी पक्षावर विरोधक टीका करत आहेत. अशातच खासदार संभाजीराजेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. भेटीवेळी संभजीराजेंनी एक विनंती केली आहे. शरद पवार यांनी स्वत: मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करायल हवी, अशी विनंती संभाजीराजेंनी शरद पवारांना केली आहे. त्यासोबतच त्यांनी  महाराष्ट्रातील सर्व राज्यसभा आणि लोकसभा खासदारांनाही एक पत्र पाठवलं आहे. महाराष्ट्रातील सर्व राज्यसभा आणि लोकसभा खासदारांनी आपापल्या परीने सभागृहामध्ये आवाज उठवला पाहिजे. याकरिता मी सर्वांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाचा विषय निर्णायक वळणावर येऊन थांबला आहे. आता सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. तामिळनाडूला वेगळा  आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय का?, असा प्रश्नही संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, सर्व खासदारांनी मिळून एकजुटीने आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपण जो ठरवाल त्यांच्या नेतृत्वात आपण पंतप्रधानांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असं संभाजीराजेंनी पत्रात म्हटलं आहे.