रतन टाटांनी कोरोनाच्या काळातही कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केला बोनस

मुंबई | कोरोनाच्या काळात अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले. त्यामुळे घरी दोन वेळचं जेवण मिळणं अवघड झालं आहे. मात्र आभाळएवढं मोठं मन असणारे भारतातील नामवंत आणि प्रसिद्ध उद्योजक टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला आहे. टाटा स्टीलने कर्मचाऱ्यांना दिवाळीत 235.54 कोटींचा बोनस दिला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. कोट्यवधींची रक्कम ही 24,074 कर्मचाऱ्यांमध्ये वाटली जाणार असल्याची माहिती आहे.

जमशेदपूर युनिटमधील ट्यूब डिव्हिजनच्या 12 हजार 807 कर्मचाऱ्यांना 142.05 कोटी रूपये मिळणार आहेत. तर बाकीचे 93.49 कोटी रुपये कलिंगानगर युनिट, मार्केटिंग आणि विक्री, नोवामुंडी, जामाडोबा, झरिया आणि बोकारो मायनसच्या 11 हजार 267 कर्मचाऱ्यांमध्ये वाटले जाणार आहेत.

दरम्यान, एकीकडे एअर इंडियासारख्या कंपनीने कर्मचाऱ्यांना पाच वर्ष बिनपगारी घरी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. काही कंपन्यांनी पगारामध्ये कपात असून कर्मचाऱ्यांना घरीही बसवलं आहे. मात्र टाटा यांनी वेळेवर पगार तर दिला परंतू बोनसही देणार असल्याचं जाहीर केल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात साजरी होणार आहे. खरंच टाटांसारख्या दिलदार व्यक्तिमत्वाचा अभिमान आहे.