महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ – देवेंद्र फडणवीस

मुंबई | राज्यातील कोविड सेंटर आणि इतरही ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.  सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, असं विधानभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीसांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. कोविड आणि क्वारंटाईन केंद्रात महिला सुरक्षेचे एसओपी तातडीने तयार करावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अन्य विषयांवर हिरीरीने बोलणारे, दिवसांतून अनेक वेळा टीव्हीवर येणारे चेहरे महिला अत्याचारांच्या विषयांवर साधा निषेध करताना सुद्धा दिसून येत नाही, हे आजचं वास्तव आहे. असंवेदनशीलतेचा हा कळस आहे, असं फडणवीसांनी पत्रात म्हटलंय.

कोणतीही घटना झाली तर केवळ आरोपीला अटक करून चालणार नाही, तर संबंधित दोषी अधिकार्‍यांवर सुद्धा कारवाई करायला हवी पण तसं कुठल्याही घटनेत झालेले दिसून येत नाही, असं फडणवीस म्हणालेत.

सातत्याने वाढणार्‍या आणि नित्य झालेल्या या घटना पाहता तातडीने कोविड सेंटर्ससंदर्भात एसओपी तयार करण्याची आवश्यकता आहे. महिला अत्याचाराच्या घटना होणार नाहीत यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासन संवेदनशील असलं पाहिजे. या घटनांकडे आपण गांभीर्याने लक्ष द्याल आणि आवश्यक त्या उपाययोजना कराल, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.