पुणे शहरातुन लोकसभा काँग्रेस चे उमेदवार मोहन जोशी


पुणे शहरातुन लोकसभा २०१९ करीता काँग्रेस चे उमेदवार मोहन जोशी यांची उमेदवारी

जाहीर केली. तेव्हा सर्वांच्या तोंडातून नकळत एकच उद्गार आला तो म्हणजे निष्ठावंताला मिळाले फळ.संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांंनी मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरु झाली होती. जवळपास सर्वांनीच त्यांची उमेदवारी गृहीत धरली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खेळीमुळे मराठा तितुका मेळवावा चा प्रयोग पुन्हा एकदा करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. त्यात रविवारी लाल महालात झालेल्या बैठकीत प्रवीण गायकवाड यांनी मुख्यमंत्री कोण, पालकमंत्री कोण, महापौर कोण याचा विचार करा, असे सांगत आपला प्रचाराचा रोख कसा असणार हे स्पष्ट केले. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होताच त्याला अनेकांनी विरोध करीत निषेध केला. राज्यात मनसे काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दर्शवित असली तरी गायकवाड यांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यानंतर मात्र काँग्रेसने आपला निष्ठावंत कार्यकर्ताच बरा असा विचार करुन मोहन जोशी यांची उमेदवारी जाहीर केली.
मोहन जोशी हे गेली ४० वर्षापासून काँग्रेस पक्षाचे काम करीत आहेत. कोणत्याही पदाची अपेक्षा न धरता त्यांनी केलेल्या कामामुळे सुरेश कलमाडी यांनी त्यांच्यातील गुण हेरुन त्यांची शहराध्यक्षपदी निवड केली.

सुमारे ६ वर्षाहून अधिक काळ त्यांनी शहराध्यक्ष म्हणून काम केले. सुरेश कलमाडी यांच्या अत्यंत जवळचे म्हणून त्यांची गणना त्यावेळी केली जात होती. निवडणुकीत तसेच महापालिकेतील पदांचे वाटप यामध्ये त्यांचे मत महत्वाचे ठरत होते. मात्र, सुरेश कलमाडी यांनी १९९८ मध्ये काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मोहन जोशी हे त्यांच्याबरोबर जाणार हे जवळपास सर्वांनी गृहीत धरले होते. मात्र, आपण काँग्रेस कधीही सोडणार नाही, असे सांगत सुरेश कलमाडी यांच्या निर्णयाला पुण्यातून सर्वप्रथम विरोध करण्याचे काम मोहन जोशी यांनी दाखविले होते.

काँग्रेसमधील बहुतांश नगरसेवक कलमाडी यांच्या पुणे विकास आघाडीत सहभागी झाले होते. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत सुरेश कलमाडी यांच्या पुढे कोणाला उभे करावे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आजच्या सारखा उमेदवारीचा प्रश्न रेंगाळला होता. तेव्हा शहराध्यक्ष असलेल्या मोहन जोशी यांनी काँग्रेसचा उमेदवार कोणीही असला तरी मतदान उमेदवाराला नाही तर पक्षाला करा असा सांगत प्रचारफेरी काढण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर विठ्ठल तुपे यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांच्या पाठीमागे पक्षाची सर्व यंत्रणा उभी करुन त्यांना निवडुन आणण्यात त्यांचा शहराध्यक्ष म्हणून मोठा वाटा होता. त्यानंतर विधान परिषदेचे तिकीट देण्याची वेळ आली. तेव्हा प्रथम त्यांच्या नावाचा विचार झाला. पण ऐनवेळी त्यांना वगळण्यात आले. तरीही त्यांनी राग न मानता पक्षाचे काम सुरु ठेवले. त्यामुळे दोन वर्षांनी पुन्हा विधान परिषदेच्या निवडणुका लागल्य. तेव्हा त्यांची निवड करण्यात आली. तेव्हाही कार्यकर्त्यांनी निष्ठेला मिळाले आमदारकीचे फळ मिळाले.

त्यांनी गुजरातमध्ये यापूर्वी निरीक्षक म्हणून काम केले आहे. या शिवाय विविध राज्यांमध्ये काँग्रेसचे निरीक्षक म्हणून काम केले आहे. १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली़ त्यावेळी काँग्रेसने मोहन जोशी यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा त्यांच्या जनसंपर्काची चुणूक दिसली होती. वाजपेयी यांच्या करिश्मामुळे प्रदीप रावत हे निवडुन आले होते. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार विठ्ठल तुपे यांना मागे टाकून मोहन जोशी यांनी दुसऱ्या क्रमांकाची २ लाखांहून अधिक मते घेऊन सर्वांना धक्का दिला होता.