बांधकाम परवानगीतून 510 कोटींचे उत्पन्न

महापालिकेच्या उत्पन्नात भर

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेला यंदा बांधकाम परवानगीतून सुमारे 510 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. निश्‍चित केलेल्या उद्दीष्टापेक्षा हे उत्पन्न 55 कोटींपेक्षा अधिक आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी बांधकाम परवानगीच्या उत्पन्नात 111 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. मोशी, चर्‍होली, पुनवळे, ताथवडे, वाकड, रावेत या परिसरात या वर्षात बांधकामे मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडण्यास मदत झाली आहे.

बांधकाम परवान्याच्या माध्यमातून पालिकेला दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचे उत्पन्न होते. 2009-10 या आर्थिक वर्षात जेमतेम 100 कोटी रुपये महापालिकेला बांधकाम परवान्यातून मिळत होते. 2013-14 मध्ये 334 कोटी इतके उत्पन्न पालिकेला मिळाले. 2014-15 मध्ये बांधकाम क्षेत्रात असलेल्या मंदीमुळे यात घसरण झाली आणि त्यावर्षी हे उत्पन्न 239 कोटी रुपयांवर आले.

मात्र, यंदा हा आकडा 510 कोटींवर पोहोचला आहे. बांधकाम क्षेत्र पुन्हा एकदा भरारी घेऊ लागल्याची ही चिन्हे आहेत. पिंपरी चिंचवड शहरात सध्या नवीन बांधकामे मोठ्याप्रमाणावर सुरू आहेत. नव्याने पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये अद्यापही मोकळ्या जागा शिल्लक असल्याने तेथे गृहप्रकल्प सुरू आहेत. त्याचा पालिकेला फायदा झाला आहे.

Latest News