पालिकेच्या अधिकारी, कर्मचार्यांना तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश

नागरिकांची फरफट थांबविण्यासाठी आयुक्तांचा सुचना

पिंपरी चिंचवड ः पालिकेच्या विविध कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेल्या नागरिकांचे अधिकार्‍यांनी त्वरित निवेदन स्विकारावे. त्यांच्याशी सौजन्याने वागावे. तसेच ओळखपत्र आणि गणवेश परिधान करावा, असे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. तक्रारीचा निपटारा करण्यास विलंब करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांबरोबरच विभागप्रमुखांवर कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालय, आठ क्षेत्रीय कार्यालये, दवाखाने, कर संकलन कार्यालये, तसेच इतर विभागांचा मोठा विस्तार आहे. शहरातील सुमारे 22 लाख नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी महापालिका आस्थापनेवर सुमारे साडेसात हजार अधिकार व कर्मचारी आहेत.

कर्मचार्‍यांना कार्यालयीन शिस्त हवी…
पालिकेच्या विभागांमध्ये दररोज हजारो नागरिक कामानिमित्त येत असतात. नागरिकांच्या अर्जावर, निवेदनावर, पत्रावर विहित कालावधीत कारवाई करणे कर्तव्य आहे. तथापि, तांत्रिक विभागामार्फत अर्जावर मुदतीत कार्यवाही केली जात नाही. पत्रव्यवहार केला जात नाही. तोंडी माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. त्याचबरोबर कार्यालयात येणार्‍या नागरिकांशी अधिकारी, कर्मचारी सौजन्यपूर्ण वागणूक देत नाही. या नागरिकांना संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत इतरत्र फिरत आल्याबाबत आणि जागेवर उपलब्ध नसल्याच्या आयुक्त कार्यालयात लेखी, तोंडी तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत. हे कार्यालयीन शिस्तीस धरुन नाही.

तक्रारीची दक्षता घेणे आवश्यक…
नागरिकांच्या कामाचा विहीत मुदतीत निपटारा होईल. कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही. याची दक्षता घ्यावी. कार्यालयात प्रवेश करताना अधिकारी, कर्मचार्‍यांनी कामावर हजर असताना गणवेश परिधान करावा. विभागाच्या आहरण-वितरण अधिकारी, वरिष्ठ पर्यवेक्षकीय अधिकारी यांनी आपल्या आस्थापनेवरील कर्मचार्‍यांनी ओळखपत्र व विहित केलेला गणवेश परिधान केला आहे की नाही याची दैनंदिन तपासणी करण्यात यावी. कर्मचार्‍यांनी ओळखपत्र लावले नसेल, गणवेश परिधान केला नसल्यास संबंधित कर्मचार्‍यांबरोबरच आहरण-वितरण अधिकारी, वरिष्ठ पर्यवेक्षकीय अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

Open chat