शिवसेनेशी युती करा; तडजोड नाहीः मोदींच्या सूचना

शिवसेनेशी युती करा; तडजोड नाहीः मोदींच्या सूचना

मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्रात शिवसेनेशी युती करायचीच आहे, तडजोड नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

त्यानुसार भा.ज.पा.ने तडजोड न करण्याचा पवित्रा घेतला; तर युतीचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर युतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय होण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली आहे. दरम्यान, दोन्हीही पक्षांमध्ये जोरदार ‘इनकमिंग’ सुरू असल्याने युती होणार की नाही, याबाबत राज्यभरात खमंग चर्चा सुरू झाल्या आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत युतीची बोलणी अद्याप जाहिररीत्या सुरू झाली नसली, तरी ‘वर्षा’ आणि ‘मातोश्री’वर खलबते सुरू आहेत. त्यातच महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणण्याचा भा.ज.पा.चा या वेळी निकराचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेची युती केली, तरीही त्यातून भा.ज.पा. पावणेदोनशे ते दोनशे जागा लढविण्यास इच्छुक आहे. त्यामुळे शिवसेनेशी युती करायची असली, तरी त्यांच्याशी तडजोड करायची नाही, अशी भूमिका केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांनी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना हेच बजावले असल्याचे सूत्रांनी सांगितले. युती झाल्यास भा.ज.पा.ने या निवडणुकीत लढविलेल्या जागांपैकी ८० टक्के जागा जिंकून आणण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांतील भा.ज.पा.च्या घडामोडी पाहता पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात भा.ज.पा.ला खाते उघडण्याइतपतही यश मिळाले नव्हते. त्यामुळे साताऱ्यात मोठ्या प्रमाणात कमळ फुलविण्याची व्यूहरचना झाली असून त्यादृष्टीने पक्ष प्रवेशही घेण्यात आले आहेत.

मराठवाड्यात वातावरण तयार करण्यासाठी सोलापूरमध्ये झालेला मेळावा तसेच पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमांमुळे शिवसेनेवर तेथेही आडून शरसंधान करण्याचा प्रयत्न भा.ज.पा.ने केल्याची चर्चा आहे. औरंगाबाद येथे पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेण्याचा प्रयत्नही भा.ज.पा.कडून सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील आठवड्यात होणार हालचाली भा.ज.पा.कडून पुढील आठवड्यात शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि त्यांच्या संभाव्य मतदारसंघाबाबत नव्याने आढावा घेण्यास सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. युती न झाल्यास शिवसेनेतील काही आमदारांना भा.ज.पा.मध्ये घेण्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणात होतील. त्यासाठी काही मंत्र्यांवर खास जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. भा.ज.पा.कडून ७ सप्टेंबर रोजी पक्षात मोठी भरती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले असून या भरतीला ‘युती’ची किनार असल्याचा सूत्रांचा दावा आहे.

Open chat