‘जलसा’ बंगल्यासमोर मुंबईकरांनी निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे कौतुक केले. तसेच आरेतील वृक्षतोडीला अप्रत्यक्षपणे पाठींबा देत झाडे बागेत लावा, असा सल्ला त्यांनी सोशल मीडियावरून दिला. त्यांच्या या ट्विटमुळे मुंबईकर प्रचंड संतापले आहेत. आज अमिताभ यांच्या जुहूतील ‘जलसा’ बंगल्यासमोर मुंबईकरांनी निदर्शने केली. ‘आरे वाचवा’, ‘बच्चन सर बागेतून कधीच जंगल तयार होऊ शकत नाही’, असे फलक घेऊन अमिताभ यांच्या घरासमोर आंदोलक उभे राहिले होते.

मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील जवळपास 30 हेक्टर जमीन वापरण्यात येणार आहे. या जमिनीवरील दोन हजाराहून अधिक झाडांची कत्तल केली जाणार आहे. या वृक्षतोडीला नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि काही सेलिब्रेटींकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्यातच इतर वाहनांपेक्षा मेट्रो सेवा अधिक कार्यक्षम आणि सोयीस्कर आहे, हे सांगण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या एका मित्राचे उदाहरण दिले, ‘मेडिकल इमर्जन्सीवेळी माझ्या मित्राने त्याच्या गाडीने नाही तर मेट्रोने जाण्याच्या मार्ग निवडला. त्याने परतल्यानंतर खासगी वाहनापेक्षा मेट्रो अधिक कार्यक्षम असल्याचे सांगितले, असे म्हणत प्रदूषणावर उपाय म्हणजे अधिकाधिक झाडे लावा. मी माझ्या बागेत झाडे लावली आहेत, तुम्ही लावली का?’ असा सवाल अमिताभ यांनी केला.

Open chat