चिंचवड विधानसभा मतदार संघातून तृतीयपंथी नताशा लोखंडे निवडणूक लढविणार

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जनहित लोकशाही पार्टीच्या वतीने नितीश (नताशा) लोखंडे (तृतीयपंथी उमेदवार) निवडणूक लढविणार
दि. 23 सप्टेंबर 2019 – जनहित लोकशाही पार्टी यांच्या वतीने सोमवारी 23 सप्टेंबर 2019 पिंपरीमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पार्टीच्या वतीने पिंपरी विधानसभा मतदारसंघातून पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव रामचंद्र आल्हाट, चिंचवड विधानसभा मतदारसंघातून नितीश (नताशा) लोखंडे (तृतीयपंथी उमेदवार), भोसरी विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक विश्वास गजरमल आणि मावळ विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोषदादा चौधरी यांची उमेदवारी जाहिर करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. विनोदराव मोरे, महाराष्ट्र उपाध्यक्ष मिलिंद साळवी, महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब पाटोळे, जनहित कामगार महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोज माने, पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब तिरकुंडे, युवक आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आसिफ शेख, निकिता मुख्यदल आदी उपस्थित होते.
यावेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहिर झालेल्या नितीश (नताशा) लोखंडे (तृतीयपंथी उमेदवार) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, थोर क्रांतीकारक महात्मा जोतीराव फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले, माता रमाई, या सर्व थोर समाजसुधारक माता-पित्यांना मी प्रथम अभिवादन करते. घटनेतील दुरुस्तीमुळे आम्हा एलजीबीटींना 377 कलमाच्या दुरुस्तीमुळे या प्रगल्भ लोकशाही राष्ट्रात स्वतंत्र दर्जा मिळाला. या घटना दुरुस्तीसाठी ज्ञात, अज्ञातपणे पाठबळ देणा-या सर्वांचे मी प्रथम अभिनंदन करते व आभार मानते. 377 कलमाच्या दुरुस्तीमुळे एलजीबीटींना (एल – लेस्बियन, जी – गे, बी – बाय सेक्स्यूयल, टी – ट्रान्स जेंडर) हक्क मिळाले. परंतू त्याची अंमलबजावणी होत नाही. अजूनही आम्हाला आमचे न्याय, हक्क मिळविण्यासाठी झगडावेच लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, रहिवासी दाखला,  ड्रायव्हिंग लायसन्स, बँकेत खाते उघडणे, नवीन वाहन घेणे, घर घेणे, पासबूक, कर्ज मिळविणे, चरितार्थासाठी उद्योग व्यवसाय सुरु करणे यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शासनाच्या विकासाच्या अनेक योजना आमच्यापर्यंत अद्यापही पोहोचल्या नाहीत. देशभर एलजीबीटींची संख्या लाखामध्ये आहे. त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आमच्या प्रतिनिधी म्हणून खासदार लक्ष्मी त्रिपाठी संसदेत लढा उभारत आहेत. दिशा शेख, गौरी सावंत, सचिन वाघोडे, शायना पाटील, पंकज बोकील यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून मी काम करणार आहे. मी स्वत: नितीश (नताशा) लोखंडे हॉटेल मॅनेजमेंटची पदवीधर आहे. माझे सहकारी निकिता मुख्यदल ही देखील व्दीपदवीधर आहे. सचिन वाघोडे-पदवीधर, पंकज बोकील-अभियंता आहेत. व्यावसायिक पदवी मिळवून देखील आमच्यासारखे लाखो एलजीबीटी रोजगारापासून वंचित आहेत. चौका-चौकात भीक मागणे, छोट्या मोठ्या ऑकेस्ट्रामध्ये नाचगाण्याचे काम करणे व सेक्स वर्कर म्हणून पैसा मिळविणे. आयुष्यभर समाजाचे टक्के, टोणपे सोसत उतारवयात, अपंगत्व आल्यानंतर आम्हाला भेडसावणा-या सामाजिक व आरोग्याच्या समस्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष आहे. यातून तृतीय पंथीयांची सुटका व्हावी म्हणून एलजीबीटींचे प्रश्न सक्षमपणे समाजापुढे मांडण्यासाठी व त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी निवडणुकीशिवाय दुसरा पर्याय नाही. आता आम्हाला सहानुभूती नको तर समाज दर्जा मिळावा यासाठी आमचा हा लढा आहे.

Open chat