पिंपरी-चिंचवड ‘आरटीओ’त अनागोंदी कारभार; पिंपरी विधानसभा युवासेनेचा आरोप

पिंपरी-चिंचवड ‘आरटीओ’त अनागोंदी कारभार; पिंपरी विधानसभा युवासेनेचा आरोप

पिंपरी, दि. 25 – पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू आहे. बॅच, बिल्ला आदींच्या वितरणात गोंधळ असून, याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिकार-यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी विधानसभा युवासेनेतर्फे करण्यात आली आहे.

परिवहन विभागाकडे युवासेनेतर्फे याबाबत निवेदन देण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयातील अधिका-यांकडून भ्रष्टाचार करण्यात येत आहे. अशा अधिका-यांना निलंबित करण्यात यावे. पिंपरी – चिंचवड परिसरातील त्रस्त नागाकरिना न्याय मिळवून देण्यासाठी युवासेनेच्या पदाधिका-यांनी पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील गैरप्रकाराबाबत जाणून घेण्यासाठी या कार्यालयाला भेट दिली. नागरिकांनी केलेल्या तक्रारी विषयी अधिका-यांशी चर्चा करून प्रश्न सोडविणायची मागणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे माहिती अधिकार कायद्यानुसार याबाबत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, बॅच बिल्ला, वाहन परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, वाहन चाचणी घेणारे वाहन निरीक्षक इत्यादी विषयी माहिती प्राप्त झाली. या कार्यालयामध्ये अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार होत असल्याचे या माहितीवरून समोर आले आहे. बॅच, बिल्ला मिळण्यासाठी अपुरे कागदपत्रे, बोगस रहिवाशी दाखले, ज्या दिवशी संबंधीत अधिकारी रजेवर आहे त्याच दिवशी त्यांच्या सहीने दाखले वितरित केले असल्याचे या माहितीतून उघड झाले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फिटनेस प्रमाणपत्राच्या वाहन चाचणीचे व्हिडीओ चित्रीकरण करणे बंधनकारक असताना त्याचे कुठलेही रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचेही दिसून आले आहे. या सर्व प्रकाराची चौकशी होऊन दोषी आधिका-यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेच्या पिंपरी विधासभेच्या युवती सेनाधिकारी प्रतीक्षा घुले, पिंपरी विधानसभेचे विभाग संघटक नीलेश हाके, अॅड. अजित बोराडे, सनी कड, ओंकार जगदाळे, राहुल राठोड यांच्या वतीने करण्यात आली आहे.