आमदार लांडगे यांच्या प्रयत्नांमुळे गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पावणेदोन कोटीची मदत

आमदार लांडगे यांच्या प्रयत्नांमुळे गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पावणेदोन कोटीची मदत
माजी नगरसेवक दत्तात्रय गायकवाड यांचे प्रतिपादन
पिंपरी (7 ऑक्टोबर 2019) : राज्य सरकारकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील रूग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदारसंघातील 156 गरजू रुग्णांना 1 कोटी 65 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली. त्यामुळे गरजूंना मोठा आधार मिळाला, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक दत्तात्रय गायकवाड यांनी येथे केले.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ दिघी येथे आयोजित बैठकीत माजी नगरसेवक गायकवाड बोलत होते. या वेळी ते म्हणाले की, सरकारतर्फे मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम अंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी या न्यासाची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्याचे व्यवस्थापन केले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली. भोसरी मतदारसंघातील गरजूंना त्याचा लाभ मिळावा यासाठी आमदार महेश लांडगे यांनी प्रयत्न केले. त्यातून गरजू रुग्णांना मदत मिळाल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी गायकवाड म्हणाले की, भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्वच मोठ्या रुग्णालयांमध्ये आमदार महेश लांडगे यांनी आमदार कार्यालय प्रतिनिधी नियुक्त केला आहे. त्यांच्या आधारे रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यापासून ते त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेपर्यंत सर्व मदत केली जाते. कोणत्याही व्यक्तीला रुग्णालयासंदर्भात व रुग्ण सेवेबाबत समस्या उद्‌भवू नये ही यामागची संकल्पना आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चालविल्या जाणा-या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) आमदार महेश लांडगे यांनी सुरू केलेल्या ‘डेस्क’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशाच प्रकारे भोसरीतील आरोग्य सुविधा सक्षम करण्याबाबत पावले टाकण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.

ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 वरून 60 करण्यात यावी त्यांना रक्तदाब व मधुमेह असल्यास औषधे मोफत द्यावीत. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत ज्येष्ठांचा समावेश करावा, ज्येष्ठांसाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापन करावे आदी मागण्यासांठी ज्येष्ठ नागरिक महासंघाने राज्यातील जिल्हाधिकारी व तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलने केली होती. त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा आमदार महेश लांडगे यांनी केला, असे सांगून गायकवाड म्हणाले की, पालक आणि ज्येष्ठ नागरिक परिक्षा आणि कल्याण अधिनियम 2007 या कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना मासिक खर्च देण्याचे दायित्व मुलांवर असावे. तसेच ज्येष्ठांचे जीवन व मालमत्ता सुरक्षित रहावी अशा तरतूदी राज्य सरकारच्या धोरणात करण्यात याव्यात, अशी मागणी आमदार लांडगे यांनी विधानसभेत केली होती. त्याबाबत भाजप सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे सांगण्यात आले. पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर याबाबत निर्णय अपेक्षित असल्याचे माजी नगरसेवक गायकवाड यांनी सांगितले.