देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच राज्यात सरकार स्थापन होणार,:-नितीन गडकरी

मुंबई – महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात सरकारची स्थापना होईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी गुरुवारी स्पष्ट केले. सरकार स्थापनेच्या घडामोडींवर ते माध्यमांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी यांचे देखील नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे. परंतु, आपण सध्या केंद्रातच आहोत आणि राज्यात परतण्याची काही इच्छा नाही असे म्हणताना गडकरींनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. राज्यात सरकार स्थापनेसाठी अतिशय कमी कालावधी आहे. अशात कुठल्याही पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला नाही, तर राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू केली जाऊ शकते.

संघाचा सरकार स्थापनेशी काहीच संबंध नाही -गडकरी

उल्लेखनीय बाब म्हणजे, सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेना नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिले होते. यानंतर मोहन भागवत यांच्याशी देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही चर्चा केली. यामध्ये सरसंघचालकांनी गडकरींना काय गुरुमंत्र दिला याची चर्चा सुरू आहे. परंतु, संघाचा आणि राज्यातील सरकार स्थापनेचा काहीच संबंध नाही. या दोन्ही गोष्टींचा संबंध जोडणे चुकीचे ठरेल असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.