महिला तहसीलदाराला जिवंत जाळले, तेलंगणातील खळबळजनक घटना

महिला तहसीलदाराला जिवंत जाळले

तेलंगणातील खळबळजनक घटना

जमिनीच्या वादातून तहसीलदार कार्यालयात आलेल्या एका व्यक्तीने महिला तहसिलदाराच्या अंगावर पेट्रोल ओतून भर दिवसा तिला जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना हैदराबादजवळील अब्दुल्लापरमेट येथे घडली आहे. विजया रेड्डी असे या तहसिलदाराचे नाव असून रेड्डी यांचा जागीच मृत्यू झाला. रेड्डी यांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या कार्यालयातील एक मदतनीस आणि चालक हे दोघे जखमी झाले आहेत, तर हल्लेखोर के. सुरेश हाही भाजला आहे.

स्थानिक के. सुरेश हा सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तहसीलदार कार्यालयात आला होता. त्याने तहसीलदार रेड्डी यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जाळले. हल्ला केल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला हा हल्लेखोर काही अंतर धावल्यानंतर खाली कोसळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरेश हा स्थानिक शेतकरी तसेच मालमत्ता खरेदी-विक्री एजंट असून याचा जमिनीशी संबंधित काही वाद होता, त्यासाठी तो तहसीलदार कार्यालयात आला होता.

वयाच्या तिशीत असलेल्या विजया रेड्डी या सन २००९च्या तुकडीतील गट-२मधील अधिकारी होत्या. त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुले असा परिवार आहे.…..या धक्कादायक घटनेनंतर तेलंगणा राज्यात विविध ठिकाणी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने करत, या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.