संगणक अभियंत्याने एकतर्फी प्रेमातून केला तरुणीचा विनयभंग

पिंपरी – संगणक अभियंत्याने एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग केल्याची घटना पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडीमध्ये घडली आहे. याप्रकरणी संबंधित तरुणीने पोलिसात फिर्याद दिली असून तरुणी चेन्नई येथे राहण्यास आहे. पिनाक नेपाल मुजुमदार (वय ३०) असं विनयभंग करणाऱ्या आरोपी संगणक अभियंत्याचे नाव आहे. तो हिंजवडी येथील एका नामांकित कंपनीत काम करतो. घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिनाक नेपाल मुजुमदार आणि संबंधित तरुणी हे ओळखीचे असून दोघे मित्र आहेत. २०१२ ला दोघेही चेन्नई येथे एकत्र नोकरी करत होते. परंतु,२०१७ ला मुजुमदार हा हिंजवडी येथील नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत झाला. दोघांचे फोन आणि मेसेजद्वारे केवळ मित्र या नात्याने बोलणे सुरू होते. मध्यंतरी आरोपी मुजुमदारचा वाढदिवस झाला तेव्हा देखील तरुणी हिंजवडी येथे आली होती. मात्र,डिसेंबर महिन्यात चेन्नई येथून तरुणीला मुजुमदारने राहत्या घरी बोलावून ‘तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू काहीच उत्तर देत नाहीस’ असं म्हणून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तरुणी घाबरलेल्या अवस्थेत त्याच रात्री चेन्नईला निघून गेली. दरम्यान,रविवारी या प्रकरणी तरुणीने हिंजवडी येथे येऊन फिर्याद दिली आहे. अद्याप आरोपी हा फरार आहे. घटनेचा अधिक पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर या करत आहेत.

Open chat