न्यायाधीश एस. मुरलीधर यांच्या बदलीची अधिसूचना जारी..#दिल्ली हिंसाचारप्रकरणी

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यावरुन दिल्लीत हिंसाचार उसळला आहे. आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला असून 100 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावणाऱ्या न्यायाधीशांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

राजधानी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचाराने आतापर्यंत 34 बळी घेतले आहेत. पोलिसांनी अटकसत्र सुरू केलं असून आतापर्यंत 106 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे ही हिंसा झाल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या न्यायाधिशांची रातोरात बदली करण्यात आली आहे.

राष्ट्रपती भवनमधून न्यायाधीश एस. मुरलीधर यांच्या बदलीची अधिसूचना जारी करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर न्यायाधीश एस, मुरलीधर यांची बदली पंजाब हरियाणा हायकोर्टात केली. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाच्या समितीने १२ फेब्रुवारीला दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीश एस मुरलीधर यांची बदली पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात करण्याची शिफारस केली होती.

Open chat