पुण्यात दारूच्या खरेदीसाठी महिलांसाठी वेगळी रांग…

पुणे : लॉकडाउनमध्ये मद्य विक्रीस सरकारने परवानगी दिली. यानंतर देशभर मद्य दुकानांसमोर मोठ्या रांगा लागल्या. काही ठिकाणी महिलाही रांगेत उभ्या असलेल्या दिसल्या! महिलांना त्रास होऊ नये म्हणून पुण्यात मद्य चालकांनी चक्क महिलांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था केली. त्यास चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. काही तरुणी चक्क रांगेत थांबून मद्याची खरेदी करतानाचे चित्र पाहायला मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन आहे. गेल्या ४० दिवसांपासून मद्यविक्री बंद होती. प्रतिबंधित भाग वगळता प्रशासनाने मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. यानंतर मद्याच्या दुकानासमोर मद्यप्रेमींच्या तब्बल एक ते दीड किलोमीटरच्या रांगा लागल्या. गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत आहे. आता मद्य खरेदीसाठी टोकन देण्यात येत आहे. त्याचीही संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. याउपरही, भर उन्हात मद्य खरेदीसाठी मद्यप्रेमी गर्दी करत आहेत. यात महिलाही दिसत आहेत. भांडारकर रस्त्यावरील एका मद्यविक्री दुकानासमोर महिलासांठी विशेष रांग तयार करण्यात आली आहे. महिलांची संख्या आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे दुकानदारांनी सांगितले. मद्यखरेदीसाठी येणार्‍या महिलांकडूनही सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे.

Latest News