पुण्यात कोरोनाचे रुग्ण संख्या दुप्पटीने होण्याचा वेग मंदावला

पुणे: मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोनारुग्णांची संख्येत वाढ होत आहे. त्यात पुणेकरांसाठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली किंवा मृत्यूदर जास्त असला तरी रुग्णसंख्या दुप्पट होणाच्या वेग मंदावला आहे. आधी 5 दिवस, मग 8 दिवस, नंतर 11 दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होत होती. आता 13 दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट होत आहे, ही बाब दिलासादायक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी म्हटलं आहे पुण्यात शुक्रवारी दिवसभरात 99 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय पुण्यात वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनारुग्णांपैकी 76 जणांची प्रकृती गंभीर आहे. 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. याचा अर्थ अजून पुढचे काही दिवस रुग्णसंख्या आणि परिस्थिती आटोक्यात येण्याची चिन्हं दिसत नाहीत. आतापर्यंत पुण्यात 137 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2245 आहे. त्यातले सर्वाधिक रुग्ण डॉ. नायडू रुग्णालयात आहेत. पुण्यात 31 मे पर्यंत आकडा 9000 वर जाण्याची शक्यता आहे, असं गंभीर भाकित पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी केलं होतं. परिस्थितीशी सामना करायला तशी तयारीही करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पुण्याचा विस्तार आणि लोकसंख्येच्या मानाने हा आकडा भयावह आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. पुणे पालिकेने तब्बल 9 हजार बेड्सचं तात्पुरतं कोविड आयसोलेशन सेंटर उभारणार असल्याचं सांगितलं आहे. बालेवाडी क्रीडा संकुलातील विविध इनडोअर हॉल्समध्ये तात्पुरते कोविड विलगीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी तातडीने तात्पुरत्या बेड्सची खरेदी करण्यात येणार आहे. पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Latest News