पुण्यात कोरोना कहर सुरुच

पुणे : पुण्यात गेल्या दोन दिवसांत अडीचशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले असून, याच लॉकडाऊनच्या काळात रस्त्यांवरील वर्दळही वाढली आहे. सध्याच कोरोनाचा उद्रेक झाला असून, सोशल डिस्टसिंग न पाळल्यामुळे येत्या काही दिवसांत तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात गेल्या दोन दिवसांत कोरोनामुळे १९ जणांना प्राण गमवावे लागले. जिल्ह्यात बळींची संख्या महिनाभरात दिडशेच्या आसपास पोहोचली आहे. रेड हॉट स्पॉट जाहीर झालेल्या ६९ भागातही लॉकडाऊनची अंमलबजावणी पुरेशा प्रमाणात होत नसल्याचे दिसून येते. बाजूला कोरोनाचा उद्रेक, तर दुसऱया बाजूला दीड महिना घरात बसून राहिल्यामुळे घराबाहेर पडण्याची लोकांची इच्छा, अशा कात्रीत प्रशासन अडकले आहे. त्याचा थेट परिणाम त्यांच्या निर्णय प्रक्रियेवर प्रतिबिंबित झाला आहे. विविध विभागातर्फे घेण्यात येणारे निर्णय परस्परविरोधी असल्याचे गेल्या आठवड्यात प्रकर्षाने जाणवले. पेट्रोल विक्री, दुकाने उघडण्याची संख्या व वेळा, मद्य विक्रीची परवानगी अशी काही उदाहरणे सहज सांगता येतील वाहने रस्त्यांवर मोठ्या संख्येने येऊ लागल्याने शहरातील वर्दळ महिनाभराच्या तुलनेत गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली. ठिकठिकाणी गर्दी दिसत आहे. अशा काळात कोरोनाच्या संसर्ग वाढल्यास, पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका आहे. दुर्दैवाने तसे घडल्यास कोरोनाचा उद्रेक आणखी तीव्र होण्याची भिती निर्माण झाली आहे.

WhatsApp chat