पुण्यातील डॉक्टर दाम्पत्य बेंगलोर हायवेवर गाडी पलटी होऊन अपघात जागीच मृत्यू

अपघातातील दाम्पत्य त्यांच्या मुलाला कोल्हापूरला आणण्यासाठी जात असल्याची माहिती

पुणे- बंगळुरु महामार्गावर उंब्रजजवळील भोसलेवाडी गावाच्या हद्दीत भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात डॉक्टर पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. अमित आप्पाजी गावडे (वय३८), डॉ. अनुजा अमित गावडे (वय३५, दोघे रा. ग्रीन फिल्ड सोसायटी, हडपसर, पुणे) अशी अपघातात मृत्यू झालेल्या पती-पत्नीची नावं आहेत. सातारा ते कराड मार्गीकेवरून कोल्हापूरकडे जाणारी कार (एमएच १२ जेयू.८८९२) ही भोसलेवाडी हद्दीतून भरधाव वेगात जात असताना चालकाचा मोटारीवरील ताबा सुटल्याने मोटार महामार्गाच्या दुभाजकाला धडकून सातारा मार्गीकेवर जाऊन पलटी झाली. यामध्ये मोटारीतील अमित गावडे व डॉ. अनुजा गावडे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. अपघातातील दाम्पत्य त्यांच्या मुलाला कोल्हापूरला आणण्यासाठी जात असल्याची माहिती घटनास्थळावरून समजली. या अपघातात मोटारीचा अक्षरशा चुराडा झाला आहे. अपघाताची माहिती समजताच उंब्रज पोलीस ठाण्याचे साहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, अमित पवार, सलीम देसाई, रमेश खुणे यांनी अपघातस्थळी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य केले. अपघातात दाम्पत्य जागीच ठार झाल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

WhatsApp chat