पुण्यात वैदकीय यंत्रणेचा भोंगळ कारभार उघड: अंबुलन्स अभावी एकाचा मृत्यू

पुणे : व्यवस्थेला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. रुग्णाल रस्त्यावर खुर्ची टाकून रुग्णाला बसवून, तब्बल तीन तास रुग्णवाहिकेची वाट पाहूनही, रुग्णवाहिका न आल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील नाना पेठेत घडली. या घटनेवरुन वैद्यकीय यंत्रणेवरील ताण दिसतो पण प्रशासनाकडून उपचाराचे जे दावे केले जात आहेत, त्यांचं पितळ उघडं पडलं आहे. पुण्यासारख्या आयटी शहर, संस्कृतिक, आणि शिक्षणाची पंढरी असलेल्या शहरात रुग्णवाहिका न मिळाल्यानं जर एखाद्याचा मृत्यू होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल. नेमकी घटना काय? यशुदास फ्रान्सिस यांचं कुटुंब पुण्यातील नाना पेठ इथं राहतं. मात्र या परिसरात कोरोनाचा कहर असल्याने, हॉटस्पॉटमुळे हा परिसर सील करण्यात आला आहे. यशुदास फ्रान्सिस यांची पहाटेच्या सुमारास प्रकृती बिघडली. यशुदास फ्रान्सिस यांना रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशरचा त्रास होता. ते रात्री वॉशरुमला गेले, मात्र घरात आल्यावर अचानक कोसळले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी कुटुंबीयांनी रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका येत नसल्याचं पाहून, कुटुंबीयांनी यशुदास यांना पत्रे लावून सील केलेल्या भागातून मुख्य रस्त्यावर आणलं. तिथे त्यांना खुर्चीवर बसवलं. तब्बल तीन तास रुग्णवाहिकेसाठी खटाटोप सुरु असताना, रुग्णलयांकडून अर्थहीन उत्तरं दिली जात होती. तब्बल तीन तास रस्त्यावर रुग्ण ताटकळत होता. पोलीस प्रशासन, डॉक्टर आणि रुग्णवाहिका यांच्याशी संपर्क साधूनही रुग्णवाहिका मिळालीच नाही. अखेर वाट पाहून थकलेल्या यशुदास यांनी खुर्चीवर बसल्या जागीच जीव सोडला. यशुदास यांचा मुलगा, बायको हे सुद्धा बाजूलाच खुर्ची टाकून बसले होते. रुग्णवाहिकेसाठी खटाटोप करुनही काहीच होत नसल्याचं ते पाहात होते. बसल्या जागी कुटुंबाचा आधार जीव सोडतोय आणि आपल्याला हतबल होऊन पाहण्यापेक्षा काहीच पर्याय नाही यापेक्षा मोठं दु:ख फ्रान्सिस कुटुंबीयांनी अनुभवलं नसेल. यशुदास फ्रान्सिस हे अंतिम घटका मोजत होते त्यादरम्यान एका टेम्पोतून त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांनी प्राण सोडला होता.

Latest News