महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान काय थांबेना पोलीस दलातील एकाच दिवशी 3 अधिकाऱ्यांचा मृत्यू

मुंबई / पुणे:  थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे एकाच दिवशी तीन पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मृत पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये एक पुणे येथील तर दोन मुंबईतील आहेत. मुंबई पोलिसमधील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भिवसेन हरिभाऊ पिंगळे यांचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईतील पार्कसाइट पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेले हेड कान्स्टेबल गणेश चौधरी (वय-57) यांची कोरोनामुळे मृत्यू झाला. दोन्ही अधिकारी ‘हाय-रिस्क एज-ग्रुप’मध्ये होते. त्यामुळे दोघे एप्रिलपासून रजेवर होते. दुसरीकडे, पुण्यात कोरोनाने आणखी एका पोलिसाचा बळी घेतला आहे. खासगी रूग्णालयात उपचार सुरु असताना 42 वर्षीय पोलिसाचा मृत्यू झाला आहे. वाहतूक विभागात ते रूजू होते. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिस आपल्या जीवाची बाजी लावून कर्तृव्य बजावत आहेत.

महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे 15 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात एकट्या मुंबईत आतापर्यंत 11 पोलिस कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे प्राण गमावला आहे. पुण्यात दोन तर नाशिक आणि सोलापूरमध्ये प्रत्येक एक पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मुंबईत शाहूनगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल हनुमंत कुलकर्णी (वय 32) यांचे गेल्या आठवड्यात कोरोनामुळे निधन झाले. ताप व सर्दी यामुळे अमोल कुलकर्णी आजारी होते. कुलकर्णी यांनी रुग्णनिवेदन देऊन घरी राहण्यासाठी अर्ज केला होता. नंतर अमोल कुलकर्णी यांनी सायन रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केली होती. अमोल कुलकर्णी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच अमोल कुलकर्णी हे राहत्या घरात बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने सायन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं परंतु, त्याआधीच अमोल कुलकर्णी यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं होतं. दरम्यान, 15 मे रोजी मुंबई पोलिस दलातील आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक भगवान पार्टे यांची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी ठरली. 45 व्या वर्षी एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे 55 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या पोलिसांना घरी राहण्याच्या सूचना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहेत.

Latest News