पुण्यात खासगी लॅबना कोरोना चाचणीची माहिती पालिकेला कळवणं बंधनकारक – आयुक्त शेखर गायकवाड

पुणे: पुणे शहरात रोज होत असलेल्या कोरोनाच्या साधारण पन्नास टक्के तपासण्या या खासगी लॅबमध्ये केल्या जात आहेत. ज्याचा रिपार्ट सर्वात आधी रुग्णांना मिळतो आणि त्यानंतर 24 तासाने महापालिकेला दिला जातो. त्यामुळे या चोवीस तासात कोरोना रुग्णांना स्वतः शहरात रुग्णालयात बेड शोधण्यासाठी फिरावे लागत होते. याबाबतचं धक्कादायक वास्तव ‘न्यूज18 लोकमत’ने समोर आणल्यानंतर आता महापालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुंबईप्रमाणेच आता पुण्यातही खासगी लॅबना कोरोना चाचणीची माहिती पालिकेला कळवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी हे आदेश काढले आहेत. पुण्यात सध्या 11 खासगी लॅबमार्फत कोरोना चाचणी केली जाते. या सर्व लॅबना आता कोरोना रुग्णांची इत्यंभूत माहिती सर्वात आधी पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला द्यावी लागणार आहे.पालिकेच्या या निर्णयामुळे संबंधित रूग्णांना तात्काळ उपचार देणं पालिकेला शक्य होईल. सध्या खासगी लँबमार्फत टेस्ट केल्या जाणाऱ्या रूग्णांची खासगी हॉस्पिटलमार्फत बेसुमार लूट सुरू होती. अशा रूग्णांच्या उपचारासंबंधीचा निर्णय आता पालिका घेणार आहे. कोविड पॉजिटिव्ह टेस्टची कॉपी रुग्णांबरोबरच मनपालाही देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

समोर आलं होतं धक्कादायक वास्तव

पुण्यात रोज होणाऱ्या चाचण्यांपैकी जवळपास पन्नास टक्के चाचण्या ह्या खासगी लॅबमध्ये केल्या जातात. कोरोनाची लक्षण आढळणारे अनेक नागरिक हे परस्पर खासगी लॅबमध्ये जाऊन कोरोना चाचणी करून घेत आहेत. ही चाचणी केल्यानंतर त्याचे रिपोर्ट महापालिकेला मिळण्याऐवजी आधी रुग्णांना मिळतात. आणि 24 तास उलटल्यावर ते रिपोर्ट महापालिकेकडे येतात.

दरम्यानच्या काळात पॉझिटीव्ह रिपोर्ट येणारे रुग्ण हे रुग्णालयात ऍडमिट होण्यासाठी धावाधाव करतात. खासगी रुग्णालयाकडून अश्या रुग्णांना भरमसाठ फी सांगितली जाते. या सगळ्या प्रकारात आर्थिक क्षमता नसलेल्या रुग्णांकडून बेड मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यातच खासगी रुग्णालय उपलब्ध बेडची संख्या लपवत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र आता पुण्यात महापालिकेच्या निर्णयामुळे कोरोना रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

WhatsApp chat