महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जात आहे- – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर राज्यात होत असून त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कोरोनाच्या उपचारात महाराष्ट्र जगाच्या पुढे आहे. महाराष्ट्र प्रयत्न आणि प्रयोग करणारे, धाडसी राज्य आहे. कोरोनाविरुद्धचे युद्ध आपण जिंकूच असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. आज कोरोनावर प्रभावी औषध आणि उपचार नाहीत. लक्षणानुसार काही विशेष औषधे दिली जात आहेत. लसीमुळे एन्टीबॉडी तयार केल्या जातात पण इथे प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून तयार एन्टीबॉडी आपण रुग्णाला देतो आहोत. रक्ताचा तुटवडा झाल्यावर आपण आवाहन करतो आणि रक्तदाते मोठ्या प्रमाणात पुढे येतात. आता ज्या रुग्णांनी कोरोनाला हरवलं आहे त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा अन्य रुग्णांना देऊन त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. प्लाझ्मा थेरपीचा अभिनव प्रयोग आपल्या राज्यात होतोय ही अभिनंदनीय बाब आहे. गेले साडेतीन महिने सर्वच जण अहोरात्र मेहनत करून काम करतोय. मात्र अजूनही कोरोनाचे संकट संपलेले नाही. कोरोनाच्या रुग्णांना उपचारात मदत ठरणाऱ्या प्लाझ्मा दानाबाबत लोकांना आवाहन करावे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

WhatsApp chat