1948/ 1965/ 1971/1999 ची युद्ध आम्ही जिंकली ”मोदीजी आता तुमची वेळ आहे” – पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह

नवी दिल्ली : “1948, 1965, 1971 आणि 1999 ची युद्ध आम्ही जिंकली, आता तुमची वेळ आहे” अशा शब्दात काँग्रेस नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. सिंह यांनी केंद्राला चीनविरोधात कडक भूमिका घेण्याचे सांगत चिनी कंपन्यांनी पीएम केअर्स फंडाला दिलेली देणगी परत करण्याचे आवाहनही केले “आम्ही 1948, 1965, 1971 आणि 1999 ची युद्ध जिंकली, आता चीनला सडेतोड उत्तर देण्याची तुमची (केंद्र सरकार) वेळ आहे” असे सिंह म्हणाले. “चीनशी आपला 60 च्या दशकापासून वाद सुरु आहे. गलवानची घटना पहिलीच नाही. मला खात्री आहे की भारत सरकार सैन्याबाबत आवश्यक ती खबरदारी घेत आहे” अशी आशा कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी व्यक्त केली.

“मला वाटते की, अक्साई चीन आणि सियाचीनमधील दरी बंद करण्याच्या चीनच्या हेतूविषयी आपण सावध राहिले पाहिजे. भारताने चीनविरुद्ध कठोर भूमिका घ्यावी” असे कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले.

“काही चिनी कंपन्यांनी पंतप्रधान निधीला पैसे दान केले आहेत. सीमेवर संघर्षाची परिस्थिती आहे, आपले जवान शहीद होत आहेत आणि भारतीय भागात घुसखोरी केली जात आहे, अशा परिस्थितीत शेजारच्या देशातून कोणत्याही प्रकारची रक्कम मिळाली तर ती परत करावी.” असे मत कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी व्यक्त केले.

“किती पैसे आले? हा प्रश्नच नाही. सर्वात आधी जेव्हा ते (चीन) कोरोनासाठी जबाबदार आहेत. आणि आपल्या देशावरील आक्रमणासाठीही जबाबदार असतात, त्यावेळी एखाद्या चिनी कंपनीकडून एक रुपयाही आला, तरी तो परत केला पाहिजे. स्वत:ची देखभाल करण्यासाठी भारताला चीनच्या पैशांची गरज नाही. आम्ही त्याशिवायही समर्थ आहोत” असं कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ठणकावून सांगितलं.

WhatsApp chat