भारतामध्ये TikTok गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरुन डिलिट

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने चीनला मोठा दणका दिला आहे. लोकप्रिय अ‍ॅप टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राऊझर आणि हॅलो अ‍ॅप यासारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश आहे. सरकारच्या बंदीच्या आदेशानंतर आता अ‍ॅपल आणि गुगलनेही TikTok ला दणका देत मोठा निर्णय घेतला आहे.

भारतामध्ये TikTok गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरुन हटवण्यात आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे. “अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरुन आणि गुगल प्ले स्टोअरवरुन टिकटॉक हटवण्यात आलं आहे. भारत सरकारने सोमवारी 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली. ही अ‍ॅप्स भारताच्या एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहचवणारी असून देशाच्या सुरक्षेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात येत आहे असं सरकारने सांगितलं होतं” असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

केंद्र सरकारने बंदीची घोषणा केल्यानंतर आता टिकटॉकने आपली बाजू मांडली आहे. टिकटॉकने निवेदन जारी केलं असून आम्ही चिनी सरकारला भारतीयांची माहिती दिलेली नाही असं यामध्ये म्हटलं आहे. टिकटॉकच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी भारत सरकारने 59 अ‍ॅप्स ब्लॉक करण्यासंदर्भात आदेश जारी केला असून यामध्ये टिकटॉकचाही समावेश असल्याचं म्हटलं आहे. तसेच आम्ही या आदेशाचे पालन करत आहोत. आम्हाला याबाबत सरकारच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठकीचे निमंत्रण आले असून या बैठकीत आम्हाला आमची बाजू मांडण्याची व स्पष्टीकरण देण्याची संधी मिळणार असल्याचं सांगितलं.

“टिकटॉक डेटा प्रायव्हसी व डेटा सिक्युरिटीबाबतच्या सर्व भारतीय अधिनियमांचे काटेकोरपणे पालन करत असून आमच्या भारतातील युजर्सची कोणतीही माहिती आम्ही कोणत्याही परदेशी सरकारला दिलेली नाही. चिनी सरकारलाही नाही. भविष्यात आमच्याकडे अशी मागणी करण्यात आली, तरीही आम्ही अशी माहिती कोणत्याही परिस्थितीत देणार नाही. आमच्या दृष्टीने युजर्सची गोपनीयता व अखंडता याला महत्त्व आहे. टिकटॉकने 14 भारतीय भाषांमध्ये सेवा देत इंटरनेटमध्ये लोकशाहीच आणली आहे. यामध्ये कोट्यवधी युजर्स, कलाकार, गोष्टी सांगणारे, शिक्षणक्षेत्रातील मंडळी, व टिकटॉकच्या माध्यमातून उदरनिर्वाह चालवणाऱ्या असंख्य लोकांचा समावेश आहे. यातले अनेकजण तर पहिल्यांदाच इंटरनेटचा वापर करणारेही आहेत” असं टिकटॉकने म्हटलं आहे.

WhatsApp chat