संत ज्ञानोबा आणि संत तुकोबारायांच्या पादुका एस टी बसने रवाना विठ्ठल भेटीला..

देहू: महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठू माऊलीच्या दर्शनाला दरवर्षी वारकरी पायी वारी करत पोहोचतात. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या संकटामुळे पंढरपूरच्या आषाढी वारीचं स्वरूप बदललं आहे. आज आषाढी दशमी दिवशी संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानोबा आणि संत तुकोबारायांच्या पादुका एस टी बसने रवाना करण्यात आल्या. एसटी महामंडळाच्या फुलांनी सजवलेल्या बसमधून आज दुपारी एक वाजताच्या सुमारास संतांच्या पादूका पंढरपूरला रवाना झाल्या. यंदा कोरोनामुळे ४० दिवस पायी चालणार वारकरी केवळ आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरीत दाखल होणार आहे. यंदा केवळ २० वारकऱ्यांना पंढरीला जाण्याची मुभा देण्यात आली आहे. देहू नगरीतून आज दुपारी एक वाजेच्या सुमारास जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुका एसटी बसने श्री क्षेत्र पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. पादुका ज्या बसमधून निघाल्या आहेत ती बस फुलांनी सजवण्यात आली असून बससमोर फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा पालखी सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न होत आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी यावेळी पादुकांचे दर्शन घेतले. भारत देश लवकर कोरोनामुक्त होवो, अशी तुकोबारायांच्या चरणी त्यांनी प्रार्थना केली. तसेच आज आळंदीमधून संत ज्ञानेश्वर आणि नाशिकमधून संत निवृत्ती महाराज्यांच्या पादुकाही एसटी बसमधून पंढरपूरकडे जाण्यासाठी रवाना झाल्या आहेत. पादुकांसोबत सोशल डिस्टन्सिंग राखत सुमारे २० वारकरीदेखील रवाना झाले. यावेळी बसमधून जाणाऱ्या मानकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून ६० वर्षांवरील व्यक्तींना सोबत जाण्यास परवानगी नाही, असे शासनाने अगोदरच स्पष्ट केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात उद्या १ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात कालपासूनच २ जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपुरासह राज्यातील सर्व मंदिरे बंद असल्याने नागरिकांना घरीच आषाढीचा सोहळा साजरा करावा लागणार आहे.

WhatsApp chat