पिंपरी चिंचवड महापालिका सक्षम, मोठ्या प्रकल्पांसाठी निधी उभारणी शक्य – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

पिंपरी :- (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवड महापालिकेचे कामकाज करताना विविध आव्हाने आणि प्रश्न समोर येत असले, तरी शहराच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत सक्षम असून, एकूण आर्थिक रेटिंगही चांगले असल्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रकल्पांसाठी निधी उभारणे सहज शक्य होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने नवनियुक्त आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन कै भा वि कांबळे पत्रकार कक्षामध्ये करण्यात आले. पत्रकार संघांचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांचे शाल व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. पत्रकार संघाच्या अध्यक्षा सायली कुलकर्णी,ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे, बाळासाहेब ढसाळ, सुनील उर्फ बाबू कांबळे इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले की “शहराची वाढ दरवर्षी सुमारे ५ टक्क्यांनी होत असल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरवर ताण वाढत आहे. पाण्याची वाढती गरज, अतिक्रमण, बेकायदा बांधकामे यांसारख्या समस्या समोर आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी काळात महत्त्वाचे प्रकल्प राबविण्यासाठी काटेकोर नियोजन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापालिकेचे बजेट मंजूर झाल्यानंतर पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर प्रकल्प उभारले जाणार असून, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासन गांभीर्याने काम करत आहे. त्यासाठी स्वतः मी दररोज विविध विभागांच्या बैठकांद्वारे माहिती घेत असून, प्रत्येक विभागाचे काम बारकाईने समजून घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, त्यासाठी पत्रकार व नागरिकांची साथ आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “काही चुकीचे वाटल्यास नक्की टीका करा; मात्र चांगल्या कामाचीही दखल घ्या,” असे आवाहन त्यांनी केले.
पत्रकारांना त्यांनी महापालिकेचे “एक्सटेंडेड आयज अँड इअर्स” संबोधत, फिल्डवरील वास्तव परिस्थिती प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले. पत्रकारांकडून मिळणाऱ्या फीडबॅकमुळे त्रुटी तत्काळ दुरुस्त करता येतात, असेही त्यांनी नमूद केले.
शहरातील खराब रस्त्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीची तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या आणि लगेचच दुरुस्ती करण्यात आल्याचा दाखला देत,प्रशासन व माध्यमांमध्ये सकारात्मक आणि हेल्दी रिलेशन राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
टीका ही व्यक्तीवर नसून सिस्टीममधील त्रुटींवर असते, त्यामुळे टीकेचे स्वागतच असल्याचे सांगत, त्यातूनच प्रशासनाला उणिवा समजून सुधारणा करता येतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या विविध विभागांचे कामकाज अत्यंत चांगल्या पद्धतीने चालत असून, त्याचा हेवा इतर महानगरपालिकांना वाटतो, असे गौरवोद्गारही आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे, बाळासाहेब ढसाळ यांची भाषणे झाली.
कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघांचे उपाध्यक्ष विनय लोंढे,गणेश शिंदे, रेहान सय्यद,चिटणीस संतोष जराड,सह चिटणीस मुकेश जाधव, कार्यकारिणी सदस्य प्रसाद बोरसे, जितेंद्र गवळी, अशोक लोखंडे, अमोल डंबाळे, पत्रकार प्रविण शिर्के,दिलीप देहाडे,देवा भालके,माधव सहस्त्रबुद्धे,अविनाश कांबीकार,विवेक कुलकर्णी,अर्चना मेंगडे,दिनेश दुधाळे, गणेश मोरे,विशाल जाधव, श्रद्धा प्रभुणे, सबनम सय्यद,सोमनाथ काळे, भीमराव बरकडे इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूसाहेब गोरे यांनी केले आभार डिजिटल मीडियाचे अध्यक्ष सूरज साळवे यांनी मानले.
