रॅपिडो-ओला-उबरच्या मनमानीला रिक्षाचालकांचे चोख प्रत्युत्तरपिंपरी-चिंचवडमध्ये १५ ऑगस्टपासून मेट्रो स्थानकांवर मीटरप्रमाणे रिक्षा चालणार

अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. सारंग आव्हाड यांच्या भेटीनंतर ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे डॉ. बाबा कांबळे यांनी जाहीर केले.
पिंपरी-चिंचवड, ३० जुलै २०२६ : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या भांडवलदार कंपन्यांच्या मनमानीला चाप बसवण्यासाठी तसेच रिक्षाचालक-मालकांचे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलीस आयुक्त मा. श्री. सारंग आव्हाड यांची भेट घेतली. या भेटीनंतर महाराष्ट्र रिक्षा पंचायतने प्रसिद्ध पत्रक जाहीर करून १५ ऑगस्ट २०२६ पासून पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहरातील पीसीएमसी मेट्रो स्टेशन व आसपासच्या सर्व रिक्षा स्टँडवरून मीटरप्रमाणे सेवा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरात अधिकृतपणे मीटरने रिक्षा व्यवसाय सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. अतिरिक्त पोलीस आयुक्त मा. श्री. सारंग आव्हाड यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाच्या वतीने पूर्ण सहकार्य व आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ऑगस्ट २०२६ पासून पीसीएमसी मेट्रो स्थानके व परिसरातील रिक्षा स्टँडवर अधिकृतपणे मीटरने रिक्षा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरात सध्या ५५ हजारांहून अधिक रिक्षा चालक-मालक आहेत. ऑनलाइन अॅप आधारित कंपन्यांमुळे त्यांचा व्यवसाय अडचणीत आला असून चालक-मालकांचे शोषण सुरू आहे. मीटरने व्यवसाय न केल्याने प्रवाशांचा विश्वासही कमी होत आहे. यावर मात करण्यासाठी मीटरने रिक्षा चालवणे आणि ‘शेअर-ए-रिक्षा’ सेवा सुरू करणे हा प्रभावी पर्याय असल्याचे महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विजय ढगारे पाटील स्पष्ट केले.
यापूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश यांच्या हस्ते शहरात ‘मीटर डाऊन’ करून परवानगी देण्यात आली होती. आता अतिरिक्त पोलीस आयुक्त मा. श्री. सारंग आव्हाड यांच्या सहकार्याने ही मोहीम पुढे नेत मेट्रो परिसरात मीटरप्रमाणे व्यवसाय करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. बोगस रिक्षाचालकांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी व प्रवाशांचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी पोलीस आयुक्तालय आणि वाहतूक विभागाचे कायदेशीर सहकार्य आवश्यक असल्याची मागणीही यावेळी करण्यात आली. आम्हाला योगे ते कायदेशीर सहकार्य मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र रिक्षा पंचायत प्रवक्ते धनंजय कुदळे, यांनी व्यक्त केले.
या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष विजय ढगारे पाटील, राज्य प्रवक्ते धनंजय कुदळे, ‘शेअर-ए-रिक्षा पीसीएमसी मेट्रो’चे अध्यक्ष रोहन जोगदंड, उपाध्यक्ष महेश शिंदे आणि वाहतूक विभागाचे अध्यक्ष देवाप्पा कांबळे उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क :
महाराष्ट्र रिक्षा पंचायत
मो. ७२७६२३२४२४ / ९८५०७३२४२४
