”पुण्यात कोरोनाबाधितांवर घरीच उपचार”

पुणे – मुंबईपाठोपाठ पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढतेय. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोनाबाधितांवर आता रुग्णालयाऐवजी घरीच उपचार केले जाणार आहेत. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याबाबतची माहिती दिली.

कोरोनाची सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना ही सुविधा मिळणार आहे. ज्या कोरोनाबाधित रुग्णांचे घर मोठे आहे. त्यांच्याकडे स्वतंत्र किचन, बेडरुम, बाथरुम आणि केअर टेकर आहेत, या रुग्णांवरच घरी उपचार करण्यात येतील, अशी अट पालिकेने ठेवली असून झोपडपट्टी किंवा वस्त्यांवरील रुग्णांना रुग्णालयातच उपचार दिले जाणार आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने दहा हजाराचा टप्पा ओलांडला आहे. या पार्श्वभूमीवर येथील कोरोनाबाधित रुग्णांना घरीच विलग करुन त्यांच्या उपचाराची व्यवस्था उभारली जाणार आहे. या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टर फोनवरुन सल्ला देतील. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी आणि अत्यवस्थ रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी पालिका प्रशासनाने हा उपाय सुचवला आहे, असे पुणे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

Latest News