हिंदू धर्माचा कुणीही ठेकेदार नाही. हिंदू मंदिरे आणि धर्माला कुणीही आपली मक्तेदारी समजू नये

औरंगाबाद : हिंदू धर्माचा कुणीही ठेकेदार नाही. हिंदू मंदिरे आणि धर्माला कुणीही आपली मक्तेदारी समजू नये असा टोला एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना लगावला आहे. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यातही अद्याप धार्मिक स्थळं खुली करण्यात आली नसल्याने एमआयएमकडून मंदिरं खुली करण्यासाठी मोहिम सुरु करण्यात आली आहे.

‘हिंदू धर्माचा कुणीही ठेकेदार नाही. हिंदू मंदिरे आणि धर्माला कुणीही आपली मक्तेदारी समजू नये. ज्यांना धर्माच्या नावाने राजकारण करायचं आहे ते लोक असा वाद घालतात. मी जनतेचा खासदार आहे जनतेचे प्रश्न सोडवणार. मी मंदिरात गेलो तरी मंदिराचे पूर्ण पावित्र्य राखणार. तिथे माझ्या सोबत हिंदू बांधवही असणार आहेत’, असं इम्तियाज जलील यांनी सांगितले.

एमआयएमने सुरु केलेल्या मोहिमेतंर्गत मंदिरं उघडण्यासाठी पुजाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहेत. औरंगाबादमधील प्रसिद्ध खडकेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांची एमआयएम भेट घेणार आहे. निवेदन देऊन मंदिर उघडण्याची विनंती करणार आहे. तर मशिदी उघडण्याची एमआयएमची मोहीम सुरु होणार आहे.

राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला सर्व मशिदी उघडू, असे अल्टिमेटम एमआयएम नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन 27 ऑगस्टला ठाकरे सरकारला दिले होते.

‘जेव्हा व्यवसाय, कारखाने, बाजारपेठा उघडल्या जातात, आणि बस, ट्रेन तसेच विमानाची उड्डाणे सुरु होतात, तेव्हा कोरोना फक्त धार्मिक स्थळांवर पसरेल, असे सरकारला कोणी सांगितले? सरकारच्या उत्पन्नाचे साधन असलेल्या मद्यविक्रीची दुकानेही उघडली जातात आणि मर्यादित संख्येने लोक लग्नासाठी एकत्र येऊ शकतात, तर केवळ धार्मिक स्थळे बंद का?’ असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला होता.

दरम्यान, मशिदी उघडणार असं म्हणण्याची खासदार इम्तियाज जलील यांची हिंमत कशी होते, असा सवाल नाशिकमधील साधू महंतांनी विचारला होता. एमआयएम आणि सरकारची मिलीभगत आहे, असाही आरोप यावेळी करण्यात आला होता.

दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील मंदिरं खुली करावी या मागणीसाठी काल पंढरपूर येथे आंदोलन केलं होतं. मोजक्या कार्यकर्त्यांसह त्यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी उपस्थित वारकऱ्यांना आणि नागरिकांना आजपासून मंदिरं खुली आहेत असं समजून दर्शन घेण्याचं आवाहन केलं.

Latest News