स्मिता यांची जिद्द पाहून मंत्री यशोमती ठाकूर यांनी चक्क घरी बोलवून त्यांना कौतुकाची थाप दिली.


मुंबई : ड्रायव्हिंग स्कूलमध्ये चारचाकी चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या स्मिता झगडे यांनी लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यावर मुंबईत टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेतला. स्मिता यांची जिद्द पाहून महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी चक्क घरी बोलवून त्यांना कौतुकाची थाप दिली. या सन्मानाने स्मिता अक्षरशः भारावून गेल्या. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने हताश न होता टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेणाऱ्या स्मिता झगडे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. टॅक्सीच्या ड्रायव्हिंग सीटवर असलेल्या स्मिता केवळ गाडीचेच नव्हे,
तर महिला सक्षमीकरणाचे सारथ्य करत असल्याची भावना यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. आपल्या निवासस्थानी बोलवून ठाकूर यांनी स्मिता झगडे यांचा सन्मान केला मुंबईत राहणाऱ्या स्मिता झगडे गेली सात वर्ष ड्रायव्हिंग स्कूलमध्ये चारचाकी चालवण्याचे प्रशिक्षण देत होत्या. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये त्यांचा रोजगार बुडाला. तीन महिने कुठलीही कमाई नाही, एकल पालकत्वाची जबाबदारी अशा सगळ्या परिस्थितीत स्मिता यांना आपल्या मुलीसाठी, संसारासाठी काहीतरी करणं भाग होतं. नोकरीच्या मागे न लागता, ड्रायव्हिंग ही आपली कलाच आपल्याला स्वयंपूर्ण करेल, असा विश्वास बाळगत त्यांनी टॅक्सी चालवायला सुरुवात केली. याआधी इतरांना गाडी शिकवणं आणि आता स्वत: मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सी चालवणं हा प्रवास सोपा नव्हता.
अनेकांनी त्यांना हे बाईचं काम नाही, यात पडू नये असे नसते सल्ले दिले. मात्र पहिल्याच दिवशी झालेल्या तब्बल 1500 रुपयांच्या कमाईने त्यांचा आत्मविश्वास वाढला. शहर पूर्वपदावर आल्यावर सगळं सुरळीत होईल, अशी आशा त्यांना वाटते
यशोमती ठाकूर यांनी सत्कार केल्याने स्मिता झगडे हरखून गेल्या. “ठाकूर मॅडम यांनी काही झालं, तरी मागे फिरु नकोस, मी सदैव तुझ्यासोबत आहे असं सांगत मला आशीर्वाद दिला आणि मी योग्य निर्णय घेतला, याची आज खात्री पटली” अशा भावना स्मिता यांनी व्यक्त केल्या.
“आणखी एक टॅक्सी घेऊन त्याद्वारे एका महिलेलाच रोजगार देण्याची स्मिता यांची इच्छा आहे. वाहनचालक म्हणून काम करत आपण संसाराला नक्कीच हातभार लावू शकतो” असा संदेश त्या महिलांना देतात.