मुंबई पोलिसांची पोलिसांची बदनामी करणाऱ्यांचा बंदोबस्त करू


सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात योग्य तपास करणाऱया मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी मोठे षड्यंत्र रचले होते. सोशल मीडियावर तब्बल 80 हजार किंवा त्यापेक्षाही जास्त बोगस खाती उघडून त्याद्वारे पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यात आली. बिनबुडाचे आरोप, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून आमचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला, पण आम्ही डगमगलो नाही. आता या बोगस अकाऊंट खोलणाऱयांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करू, असे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ठणकावले आहे. या प्रकरणात दोन गुन्हे दाखल केले असून बोगस खाती बनविणाऱ्यांचा कसून शोध सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई नक्की केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
सुशांत सिंह प्रकरणाचा आम्ही योग्य तपास करीत होतो. आमचा तपास सुरू असताना दुसऱया बाजूने आमच्यावर नाहक चिखलफेक केली जात होती. विविध वृत्तवाहिन्यांवरून बदनामी केली जात असतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील आमच्यावर भयानक पद्धतीने तोंडसुख घेतले जात होते. अगदी खालच्या पातळीवर जाऊन नको नको ते बोलले गेले. जेव्हा आमच्या सायबर सेलने त्या अकाऊंटची माहिती घेण्यास सुरुवात केली तेव्हा असे निष्पन्न झाले की, सोशल मीडियावर हजारो बोगस खाती खोलून त्याद्वारे पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याबरोबर नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. हा पद्धतशीर रचलेला कट असून त्याचा लवकरच आम्ही भंडाफोड करू, असे आयुक्त म्हणाले.
त्यांना सहकार्य करण्याचा प्रश्नच नाही
सुशांत सिंहने आत्महत्या केल्यानंतर आम्ही एडीआर दाखल करून तपास सुरू केला. त्याच्या पुटुंबीयांकडेही विचारपूस केली, मात्र तेव्हा कोणी तक्रार केली नाही की पुठला संशय व्यक्त केला. बिहारमध्ये गेल्यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांनी आत्महत्येची तक्रार देऊन काहींवर संशय व्यक्त केला. आमचा तपास सुरू असताना बिहार पोलीस इकडे येऊन तपास कसा काय करू शकतात? त्यांना इकडे येऊन तपास करण्याचा अधिकारच नाही. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्याचा प्रश्नच नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
मुंबईकरांचा पोलिसांवर विश्वास
गेल्या काही दिवसांत मुंबई पोलिसांना घाणेरडय़ा भाषेत वाटेल ते बोलले गेले; परंतु मुंबईकरांचा त्यांच्या पोलीस दलावर विश्वास होता. आम्ही योग्य आहोत हेच मुंबईकरांचे म्हणणे होते असे समाधान व्यक्त करताना, मुंबईकरांच्या या विश्वासाला आम्ही कधीच तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.
पोलिसांविरोधात मोठा कट
कोरोनाविरोधात अख्खे पोलीस दल दोन हात करत आहे. सुमारे सहा हजार पोलीस बाधित झाले, तर 84 पोलीस शहीद झाले. अशा भयावह परिस्थितीला तोंड देत असताना दुसऱया बाजूने सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा मोठा कट शिजला होता. यासाठी सर्व ते प्रयत्न झाले, पण मुंबई पोलीस प्रोफेशनल फोर्स आहे. आम्ही खचलो नाही, तर संयम ठेवला. मात्र आमची बदनामी करणाऱयांना अद्दल घडवू, असेही आयुक्त म्हणाले.