कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खुशबू सुंदर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला


नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खुशबू सुंदर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
खुशबू यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्राद्वारे आपला निर्णय कळवला आहे. पक्षातील मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तींकडून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचे दमन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ज्यांचा प्रत्यक्ष तळागाळात काहीही संबंध नाही, जनतेशी नाळ जोडलेली नाही असे लोक पक्षाचे नियम आणि अटी ठरवत आहेत. आपण कोणत्या पदाच्या लालसेने अथवा प्रसिध्दी मिळवण्यासाठी कॉंग्रेसचे सदस्यत्व घेतले नव्हते. 2014 च्या निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यावर आणि पक्ष कठीर परिस्थितीतून जात असताना आपण पक्षात दाखल झालो होतो. मात्र आता बराच विचार केल्यानंतर आपण पक्षाशी असलेले नाते तोडण्याचा विचार केला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, खुशबू यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना ताबडतोब पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता पदावरून हटवण्यात आले आहे. त्या आज दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. तामिळनाडूत लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.