वाकड इन्फंट जीजस स्कुल बेकायदा दहावीची अर्ज नोंदणी, पालकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसुली
पिंपरी (प्रतिनिधी )साध्या झेरॉक्सच्या कागदावर दहावीचा फॉर्म भरून त्यासाठी सहाशे रुपये घेतले, अशी तक्रार वाकड येथील इन्फंट जिझस स्कूलमधील 65 विद्यार्थ्यांच्या पालकांनी एका अर्जाव्दारे केली आहे.
शाळा आणि परिक्षा कधी सुरू होणार हे अद्याप अनिश्चित असताना शाळेने ही आर्थिक लूट केली आहे. तसेच पैसे भरल्याची कोणतीही पावती दिली नसल्याचा आरोपही या अर्जात केला आहे.
महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी मार्चमध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचे अर्ज भरण्यास ऑक्टोबरपासून सुरवात होत असते. तसेच या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थी आणि पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनाही नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचे असतात. याबरोबरच दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांना सरल डेटाबेसवरून भरून त्यांची “सरल’वर नोंद करणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरायचे असतात. तसेच पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने शाळांनी भरायचे आहेत.
यावर्षी कोरोनामुळे निकालापासून बऱ्याच गोष्टी लांबल्या होत्या. त्यामुळेच दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची माहिती अद्याप शिक्षण मंडळाकडून जाहीर केलेली नाही. तरीही, राज्य बोर्डाच्या काही खासगी शाळांनी विद्यार्थ्यांचे “खोटे’ फॉर्म भरून घेण्यास सुरवात केली आहे. संपूर्ण वर्षाचे शुल्क भरून घेण्यासाठी शाळांचा हा धडपड सुरू असल्याची पालकांनी तक्रार आहे. मुलाचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल, अशी धमकी देवून शाळेने पैसे भरून घेत आहे, असेही अर्जात म्हटले आहे.
या शाळेत आठवीच्या वर्गापासून अनेक विषयांना शिक्षक नाहीत. दहावीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन शिक्षण म्हणून ऍप डाऊनलोड करण्यासाठी दोन वेळा सहाशे-सहाशे रुपये घेतले. ऑनलाईन शिक्षण देण्याची कोणतीही यंत्रणा शाळेकडे नाही. दहावीची फॉर्म फी पन्नास रुपये असताना, सहाशे रुपये घेतले. यापैकी कशाचीही पावती शाळेने दिलेली नाही. शालेय शुल्क बॅंक स्लीपबुकवर केवळ देखाव्यासाठी भरून घेतले. त्यावर बॅंकेचा कोणताही शिक्का नाही. सर्व व्यवहार रोखीने करणे भाग पाडले, अशाही तक्रारी या अर्जात आहेत.
कोट
“पालकांनी दहावीचा अर्ज भरण्याची घाई करू नये. तसेच शाळांनी शुल्क मागीतले, ते भरू नये. ज्यां शाळांविरोधात तक्रारी असतील त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा.’
-गणपत मोरे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद