भारतीयांसाठी मोठा झटका: अमेरिकेच्या गृह मंत्रालयाने एच-1बी बिजनेस व्हिजा न देण्याचा प्रस्ताव

H1Bvisa_

वॉशिंग्टन : अमेरिकेत एकिकडे राष्ट्राध्यक्ष पदाची धामधूम सुरु आहे, तर दुसरीकडे भारतीयांसाठी अमेरिकेत जाण्यासाठी आवश्यक असलेल्या एच-1बी व्हिजावर ट्रम्प सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. अमेरिकेच्या गृह मंत्रालयाने एच-1बी बिजनेस व्हिजा न देण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवलाय. यामुळे कामानिमित्त अमेरिकेत जाणाऱ्या हजारो भारतीयांवर याचा थेट विपरित परिणाम होणार आहे

अनेक कंपन्या एच-1बी व्हिजाचा उपयोग करुन आपल्या आयटी कर्मचाऱ्यांना काही काळासाठी विशेष प्रशिक्षण किंवा तांत्रिक कामासाठी अमेरिकेत पाठवतात. यामुळे हे कर्मचारी सहजपणे अमेरिकेत जाऊन काही काळ राहून आपलं काम करुन परत भारतात येतात. मात्र, ट्रम्प सरकारने हा व्हिजा बंद केल्यास हजारो भारतीयांना याचा फटका बसणार आहे. या प्रस्तावाविषयी बुधवारी (21 ऑक्टोबर) माहिती समोर आली. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या दोन आठवडे आधीच ट्रम्प सरकारने सुरु केलेल्या या हालचालींमुळे भारतीयांचं भविष्य टांगणीला लागण्याची शक्यता आहे

ट्रम्प सरकारच्या गृह मंत्रालयाने म्हटलं आहे, “कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत बेरोजगारी वाढली आहे. अशात अमेरिकी नागरिकांसाठी नोकऱ्या वाचवणं आवश्यक आहे.” हा नियम डिसेंबरपासून लागू करण्याचा विचार सुरु आहे. मात्र याला यूएस चेंबर ऑफ कॉमर्सकडून विरोध होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत अनेक तांत्रिक कामं करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची कमतरता असल्याचं या संघटनेचं म्हणणं आहे.

Latest News