कोरोनाकाळात नेमणूक केलेल्या शिक्षकांना आता कार्यमुक्त होण्याचे आदेश

पिंपरी: कोरोनाकाळात कॉल सेंटरमध्ये नेमणूक केलेल्या शिक्षकांना आता कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्यामुळे शिक्षकांनी त्वरित मूळ आस्थापनांवर रुजू होण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात कोरोना विषाणुचा उद्रेक होऊन झपाट्याने फैलाव झाला. प्रसार रोखण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. कोरोना रूग्णांचा वाढता संक्रमणाचा धोका विचारात घेऊन शहरात कार्यरत असणा-या विविध प्राधिकरणांच्या उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, सहायक निबंधक या पदावरील अधिका-यांची पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोरोना विषयक कामकाज करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती.
महापालिका शाळांमधील शिक्षकांनाही कोरोना कामकाजाची जबाबदारी देण्यात आली. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कॉल सेंटर स्थापन करण्यात आले होते. त्याठिकाणी महापालिकेच्या शाळांमध्ये कार्यरत असणा-या 48 शिक्षकांची या कॉल सेंटरमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील कॉल सेंटरमध्ये सहा शिक्षकांची नेमणूक होती.
आता शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. दिवसाला दोनशेच्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कामकाजाच्या सोईच्या दृष्टीने शिक्षकांच्या नेमणूका रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांना त्याठिकाणावरून कार्यमुक्त होऊन मूळ विभागात रुजू होऊन कामकाजाला सुरूवात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.