भारतीय रेल्वेचे बनावट लोगो, वॉटरमार्क आणि खरे शिक्के करून ठेकेदाराला 3 कोटींना गंडा

मुंबई : भारतीय रेल्वेचे बनावट लोगो, वॉटरमार्क आणि खरे शिक्के असलेल्या बनावट खरेदी आदेश देवून रेल्वेचे मोठे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार रेल्वेच्याच एका बड्या अधिकाऱ्याने केला आहे. या अधिकाऱ्यासह एका टोळीला मुंबई गुन्हे शाखा नंबर 11 ने अटक केली आहे. अनिलकुमार माखनलाल अहिरराव असं या अधिकाऱ्याचे नाव आहे. महालक्ष्मी येथील रेल्वे कारखान्यात रेल्वे सेक्शन इंजीनिअर या मोठ्या पदावर अनिलकुमार कार्यरत आहेत. पण, आता ते सध्या मुंबई पोलिसांच्या जेलची हवा खात आहे. कारण, या अहिररावने आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन आणि 3 आरोपींच्या मदतीने एका ठेकेदाराला अगदी फिल्मी स्टाईल गंडा घातला आहे. आपल्या 3 साथीदारांच्या अटकेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी अनिल फरार झाला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ग्वाल्लेर येथून या अनिलकुमाराला अटक केली.
रेल्वेच्या दोन डब्यांना लिंक करण्याकरता लागणारे पाईपची रितसर ॲार्डर मिळवून देतो म्हणून अनिलकुमारने ठेकेदाराला आमिष दाखवले होते. त्यानंतर भारतीय रेल्वेचे बनावट लोगो, वॉटरमार्क, बनावट रबराचे शिक्के मारुन खोटे खरेदी आदेश दाखवून ठेकेदाराची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली.
रेल्वेचा सेक्शन इंजिनिअर अधिकारीच प्रत्येक व्यवहारात पुढे होता. एवढंच नाहीतर, अगदी फिल्मी स्टाइल मोठ-मोठ्या हॉटेलमध्ये बैठका घेवून, पार्ट्या करुन ठेकेदाराला या टोळक्याने त्याची फसवणूक होत आहे, याची जराही शंका येऊ दिली नाही.
अनिल अहिरराव या रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याच्या मदतीने आरोपींनी ठेकेदाराला अजनी, नागपूर आणि भुसावळ येथे बोलावून कोणताही माल न दाखवता रेल्वे अधिकाऱ्याच्या मदतीने काम मिळाल्याचे खोटे खरेदी आदेश काढून सह्या घेतल्या. जेव्हा टेंडर निघत नाही हे ठेकेदाराला लक्षात आले तेव्हा आपली जवळपास 3 कोटी रुपयांना फसवणूक झाली. हे ठेकेदाराच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली.
प्रत्येक वेळेस नवीन बकरा फसवण्याकरता ही टोळी नव नवीन युक्त्या लढवत या टोळीने याआधी देखील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा चूना लावला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे विभागात आणखी एक मोठी टोळी सक्रीय आहे, जी अशा प्रकारे फसवणूक करते. त्यामुळे आता मुंबई क्राईम ब्राचंचे अधिकारी रेल्वे विभागातील त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा शोध घेत आहेत.