मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय हा संग्राम थांबणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई | बेळगाव, कारवार, निपाणीसह ‘संयुक्त महाराष्ट्र’ हा आपला निर्धार आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी देत असलेल्या लढ्याला महाराष्ट्रातील प्रत्येकाचा सक्रिय पाठिंबा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. सीमाभागातील मराठी बांधवांच्या संघर्षाला मी देखील जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय हा संग्राम थांबणार नाही, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सीमाभागातील मराठी बांधवांचा लढा सुरु आहे. महाराष्ट्रातील जनता तसंच महाराष्ट्र सरकार सीमाभागातील नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचंही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात सामील होईल, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.