45 लाखाची फसवणुक भाजप नगरसेविकेच्या पतीला अटक

bjp-zenda-2

पिंपरी : पिंपळे गुरव येथील एका भाजप नगरसेविकेच्या पतीने जागा विकसित करण्याच्या बहाण्याने 45 लाख रुपये घेत एकाची फसवणूक केली आहे. याबाबत सांगवी पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून नगरसेविकेच्या पतीला अटक केली आहे. 

राजू रामा लोखंडे (वय 50), प्रकाश रामा लोखंडे (वय 48, दोघेही रा. वैदवस्ती, पिंपळे गुरव) अशी आरोपींची नावे आहेत. राजू लोखंडे हे माजी नगरसेवक असून, त्यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका आहेत. याप्रकरणी लक्ष्मण शिवाजी चव्हाण (वय 56, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली. राजू याच्यासह त्याच्या भावाने पिंपळे गुरव येथील एक जागा ज्वाईंट व्हेंचरमध्ये भागिदारीने विकसित करू, असे म्हणून फिर्यादीचा विश्‍वास संपादन केला. 

जागा खरेदीसाठी पाच लाख, वचनचिठ्ठी करतेवेळी पंधरा लाख आणि समजुतीचा करारनामा करतेवेळी पंधरा लाख रूपये त्यांच्याकडून घेतले. तसेच कार्यालयीन कामकाजासाठी, संरक्षण भिंत, पाण्याची टाकी बांधण्यासाठी दहा लाख रूपये खर्च करायला लावला. तरीही आरोपींनी अद्यापपर्यंत जागा विकसित करण्यासाठी दिली नाही किंवा घेतलेले पैसेही फिर्यादीला परत केले नाहीत. दरम्यान, यातून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसात धाव घेतली. सांगवी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. 

Latest News