पिंपरीत दगडफेक आणि कोयत्याने वार धुमाकूळ घालणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड


रावेत:दगडफेक आणि कोयत्याने वार करीत टोळक्याने रहाटणी भागात शुक्रवारी (दि. 30) रात्री दहशत निर्माण केली. या गुंडांची नागरिकांमधील दहशत कमी करण्यासाठी वाकड पोलिसांनी सोमवारी (दि. 2) रहाटणी आणि काळेवाडी भागात रस्त्यावरून धिंड काढली. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांनी शाब्बासकीची थाप दिली आहे.
शुभम निवृत्ती कवठेकर (वय 23, रा. बिबवेवाडी, पुणे), दीपक नाथा मिसाळ (वय 23), मंगेश मोतीराम सकपाळ (वय 23, दोघेही रा. काळेवाडी), कैलास हरिभाऊ वंजारी (वय 19), आकाश महादेव कांबळे (वय 22), सनी गौमत गवारे (वय 19, तिघेही रा. रहाटणी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर इतर दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आरोपींना न्यायलयाने तीन दिवसांची कोठडी दिली आहे. या कोठडीचा सोमवारी अखेरचा दिवस होता
तपासाकरिता वाकड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक हरीश माने, वीरेंद्र चव्हाण आणि कर्मचाऱ्यांनी सहा आरोपींना ज्या ठिकाणी तोडफोड केली होती, त्या ठिकाणी नेले. सर्व आरोपींना बेड्या घालून काठीचे फटके देत त्यांची मस्ती उतरविली. तेथील गल्ली बोळातून त्यांना फिरविण्यात आले. लहान मुलेही पोलिसांच्या मागे काही अंतर ठेवत हा बिनपैशाचा तमाशा पाहात चालली होती. काही नागरिक घरातून तर काहीजण बिनधास्तपणे बाहेर येऊन पोलिसांनी काढलेली ही ‘वरात’ पाहात होते. यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. नागरिकांमधून पोलिसांच्या या कामगिरीबाबत समाधान व्यक्त होत होते.
आरोपींनी कुठे कुठे तोडफोड केली याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आम्ही गेलो होते. तसेच आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले दोन कोयतेही हस्तगत केले आहेत.