अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी केली जाणार:कृष्ण प्रकाश

पिंपरी – पोलीस आयुक्‍तांनी वारंवार सूचना देऊनही अनेक पोलीस निरीक्षकांनी अवैध धंद्यांना अभय दिले. तसेच आता शहरात नव्याने 13 पोलीस निरीक्षक बाहेरून बदलून आले आहेत. नवीन नियुक्‍त्या करताना अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी केली जाणार असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

अवैध धंद्यांमुळे शहरातील गुन्हेगारीमध्ये वाढ होते. त्यामुळे शहरातील सर्व अवैध धंदे बंद करा, असे आदेश पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी पदाभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षकांना दिला. मात्र तरीही शहरातील विविध भागांत अवैध धंदे सुरूच होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्‍तांनी सामाजिक सुरक्षा पथक स्थापन केले. या पथकाने धडाकेबाज कारवाई करीत सुरवातीलच्या अवघ्या 17 दिवसांमध्ये नऊ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 10 ठिकाणी छापा घातला. यामुळे अवैध धंद्यांचे पितळ उघडे पडले. याबाबत पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्‍तांना विचारले असता ‘त्या’ पोलीस निरीक्षकांच्या पापाचा घडा भरल्यावर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा सूचक इशारा पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिला होता.

राज्य सरकारने नुकत्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पिंपरी चिंचवड आयुक्‍तालयाकरिता आठ सहायक आयुक्‍तांची पदे मंजूर असताना नऊ सहायक आयुक्‍त देण्यात आले. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्येही पिंपरी चिंचवड आयुक्‍तालयाला जादा अधिकारी कसे मिळतील याकडे लक्ष दिले आहे.

शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, उमेश तावस्कर आणि विश्‍वजीत खुळे यांची शहराबाहेर बदली झाली. त्यापैकी खुळे हे मॅटमध्ये गेले आहेत. त्याबदल्यात 13 पोलीस निरीक्षक शहराकरिता देण्यात आले. बुधवारी सायंकाळपर्यंत 13 पैकी 10 पोलीस निरीक्षक आयुक्‍तालयात हजर झाले. तर उर्वरित तीन पोलीस निरीक्षक हजर होतील. याशिवाय दोन सहायक निरीक्षक, चार उपनिरीक्षकही आयुक्‍तालयात हजर झाले आहेत. तसेच खात्यातर्गंत परिक्षा देऊन उपनिरीक्षक झालेले पिंपरी चिंचवड पोलीस दलातील 23 पोलीस उपनिरीक्षकही पोलीस नियंत्रण कक्षात हजर झाले असून त्यांनाही लवकरच बदलीचे ठिकाण दिले जाईल. यामुळे गुरुवार किंवा शुक्रवारी सायंकाळपर्यंत आयुक्‍तालयात हजर झालेल्या 10 पोलीस निरीक्षकांना नियुक्‍तीची ठिकाणे दिली जातील.

आयुक्  तांचे वारंवार सूतोवाच आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी पदभार सांभाळताच आपपल्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आयुक्‍तांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना करुन शहरातील बहुतेक सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर छापेमारी करायला लावली. छापेसत्र सुरु झाल्याचे माहीत असतानाही अनेक पोलीस निरीक्षकांनी आपपल्या हद्दीतील अवैध धंद्यांना आळा घातला नाही. यामुळे अजूनही छापा मारण्याचे सत्र सुरुच आहे. ‘कारवाई करणार’च असे आयुक्‍तांनी वारंवार सांगूनही अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या पोलीस निरीक्षकांना आयुक्‍त कृष्ण प्रकाश हे कात्रजचा घाट दाखविणार असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे

Latest News